कळवण : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहात विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, देसगावच्या विद्यार्थ्यांना भोजनगृह नसल्याने उघड्यावरच जेवण करावे लागत आहे. तसेच वसतिगृह नसल्याने वर्गातच झोपावे लागत लागत आहे.आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या अनेक प्रश्नांकडे कळवण तालुका आदिवासी संघर्ष समिती, आदिवासी बचाव अभियान यांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांचे लक्ष वेधले. अनेक समस्यांची जंत्रीच मंत्री सावरा यांच्यासमोर ठेवल्याने आदिवासी विकास विभागाच्या अधिकारी व यंत्रणेची चांगलीच भंबेरी उडाली. कळवण तालुक्यातील आदिवासी बांधवांनी केलेल्या मागण्या रास्त असल्याने प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांना तत्काळ समस्या सोडविण्याचे आदेश आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी यावेळी दिले.शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक, भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसून हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृह प्रवेशापासून वंचित आहेत. तसेच कळवण प्रकल्प कार्यालयांतर्गत ८२७ विद्यार्थी व विद्यार्थिनी नामांकित इंग्रजी माध्यम शाळेतील प्रवेशापासून वंचित असल्याने त्यांना प्रवेश द्यावा, अशी मागणी आदिवासी कार्यकर्त्यांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे केली. याप्रश्नी आपण स्वत: लक्ष घालून आश्रमशाळा, वसतिगृहे व नामांकीत इंग्रजी माध्यम शाळेतील प्रवेशासंदर्भातील प्रश्न सोडणार असल्याचे आश्वासन मंत्री सावरा यानंी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात भिवराज बागुल, फुलदास बागुल, पंढरीनाथ बागुल, पुंडलिक बागुल, सुभाष राऊत, कांतिलाल राऊत, पंडित बागुल, बापू बागुल, गंगाधर बागुल आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांना उघड्यावर भोजन
By admin | Published: August 31, 2016 9:59 PM