नाशिक : जात पडताळणी प्रमाणपत्रासह समाज कल्याण खात्याचे गेल्या अनेक महिन्यांपासून उंबरठे झिजविणाºया जिल्हाभरातील विद्यार्थी व पालकांच्या पदरी सोमवारीही निराशा पडली. गेल्या आठवड्यात जात पडताळणी समितीची बैठक होऊन त्यात प्रकरणे मंजूर करण्यात आल्याने सोमवारी प्रमाणपत्रे वाटण्याचे आश्वासन समाज कल्याण कार्यालयाने दिल्याने सकाळी दहा वाजेपासून विद्यार्थ्यांनी गर्दी केली, परंतु प्रमाणपत्र तयार नसल्याचे कारण देत त्यांना माघारी पाठविण्यात आले. दरम्यान, समाजकल्याण खात्याच्या कारभारा विषयी काही पालकांनी थेट उपायुक्त वंदना कोचुरे यांची भेट घेऊन तक्रारी केल्या असून, त्यात कर्मचाºयांकडून पैशांसाठी अडवणूक केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. तीन दिवसांपूर्वी ‘लोकमत’मध्ये यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर समाज कल्याण विभागाने विद्यार्थ्यांची परिपूर्ण प्रकरणे असतील तर त्यांना सोमवारी प्रमाणपत्रे वाटप करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जिल्हाभरातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी समाज कल्याण खात्यात गर्दी केली प्रत्यक्षात मात्र त्यांना नेहमीचीच कारणे देत बोळवण करण्यात आली. काही प्रकरणे तयार असतानाही सापडत नसल्याचे कारण देत नंतर बोलाविण्यात आले तर काहींना पुन्हा कागदपत्रे अपूर्ततेचे कारण सांगत प्रकरण मंजुरीसाठी समितीसमोर ठेवल्याचे सांगण्यात आले. सकाळी आलेल्या विद्यार्थ्यांना दुपारनंतर बोलावण्यात आले, तेव्हाही त्यांच्या पदरी निराशाच पडली. यावेळी काही विद्यार्थी व पालकांनी तेथील कर्मचाºयांशी हुज्जतही घातली. प्रत्येक वेळी कारणे देत टोलवाटोलवी केली जात असल्याची तक्रार करण्यात आली तर काही पालकांनी थेट उपआयुक्त वंदना कोचुरे यांची भेट घेत त्यांच्या कानी तक्रारी टाकल्या. यावेळी कोचुरे यांनी काही प्रकरणे मागून घेत त्यांच्यावर स्वाक्षरी करून दिल्या. तर काम न करणाºया कर्मचाºयांच्या नावे तक्रारी केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. पैशांसाठी कर्मचाºयांकडून अडवणूकसमाज कल्याण खात्याकडून जात पडताळणी करण्यास मुद्दाम उशीर केला जात असून, वारंवार चकरा मारूनही काम होत नसल्याचे पाहून साहजिकच विद्यार्थी व पालक वैतागतात व अशावेळी पैशांची मागणी कार्यालयातील कर्मचाºयांकडून केली जाते. खेड्यातून आलेल्या गोरगरिबांना तर व्यवस्थित मार्गदर्शन देखील केले जात नाही. उलट दुरुत्तरे करून पिटाळून लावले जाते. शासनाने याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांने शैक्षणिक नुकसान टाळावे. - लक्ष्मण मंडाले, त्रस्त पालक
विद्यार्थी रिकाम्या हाताने फिरले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 1:06 AM