सुरगाणा : तालुक्यातील बुबळी प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान दोन विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास सुरू झाल्यामुळे उपचारासाठी नेले असता याठिकाणी डॉक्टर किंवा परिचारिका उपस्थित नसल्याने येथे या विद्यार्थ्यांवर उपचार होऊ शकले नाहीत. सालभोये शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील सातवीचा विद्यार्थी संजय नामदेव वार्डे यास बुबळी गावातीलच दहावीची विद्यार्थिनी कुसुम रमेश भोये हिलादेखील उलटी होत असल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. मात्र येथे एक महिला चौकीदारशिवाय कुणीही उपस्थित नसल्याने उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे जवळपास रात्री साडेदहाच्या सुमारास दोन्ही विद्यार्थ्यांना सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथेही अर्ध्या तासाने उपचार सुरू झाल्याचे जे. वाय. मोरे यांनी सांगितले. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नेहेते यांच्याशी संपर्क साधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. बुबळी आरोग्य केंद्रात कर्मचारी नसल्याने रुग्णांवर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जे. वाय. मोरे, आर. आर. भोये, लता भोये, कमल महाले, मंगेश भोये, गोविंद डंबाळे, भाऊराव वासले यांनी केली आहे.
सालभोये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 10:58 PM