नाशिक : सौर ऊर्जेच्या मदतीने कोळशावर चालणारी आधुनिक चूल, सांडपाणी, पावसाच्या पाण्याच्या पुनर्वापरातून इंधन-वीज निर्मिती, ‘वॉशिंग फ्लो’च्या माध्यमातून गोदा प्रदूषणमुक्तीसह घनकचरा व्यवस्थापनासाठी बिल्डिंग गारबेज कलेक्टिंग सिस्टम आणि अपघातविरहित दळणवळण अशा एक ना अनेक भन्नाट संकल्पनांच्या माध्यमातून शाश्वत विकासाकडे नेणारा ‘स्मार्ट मार्ग’ शालेय विद्यार्थ्यांनी विज्ञान आविष्कारातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला.निमित्त होते, महापालिका शिक्षण मंडळाच्या वतीने बी. डी. भालेकर विद्यालयात आयोजित मनपास्तरीय प्रदर्शनाचे! महापालिका हद्दीत विविध कें द्रांवर घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविणाऱ्या पालिकेच्या शाळांसह खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांचे ‘समावेशित विकासासाठी विज्ञान-गणित’ या संकल्पनेवर आधारित प्रकल्पांचे सादरीकरण करण्याची संधी पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने मनपास्तरीय प्रदर्शनातून उपलब्ध करून देण्यात आली होती. या प्रदर्शनामध्ये पालिकेच्या शाळांसह खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन एकापेक्षा एक सरस प्रकल्प सादर करण्याचा प्रयत्न केला. सुमारे ११४ शाळांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला. सकाळी दहा वाजता महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, शिक्षण समिती सभापती संजय चव्हाण, प्रशासन अधिकारी उमेश डोंगरे, विज्ञान विभाग प्रमुख राजश्री गांगुर्डे आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रकांत गायकवाड यांनी केले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांचा विज्ञान आविष्कार
By admin | Published: December 28, 2015 10:24 PM