नाशिक : विद्यार्थ्यांनी ध्येय ठरविल्यानंतर ते प्राप्त करण्यासाठी जिद्द व चिकाटीने मेहनत घेतल्याशिवाय ध्येय साध्य होऊन यशस्वी होता येत नाही, असे प्रतिपादन भविष्य निर्वाह निधीचे प्रादेशिक आयुक्त एम. एम. अशरफ यांनी केले.वडाळारोडवरील जेएमसीटी तंत्रनिकेतन महाविद्यालयात हेल्पिंग आॅपरेस्ड पीपल फॉर एज्युकेशन फाउंडेशन (होप) व जेएमसीटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व करिअर गाइडन्स सोहळ्यात अशरफ प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर समाज कल्याण विभागाचे माजी प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल, सनदी लेखापाल मंजूर शेख, जेएमसीटीचे अध्यक्ष हाजी हिसामुद्दीन खतीब, हाजी रऊफ पटेल, होपचे अध्यक्ष जहीर शेख, सचिव प्रा. नूर-ए-इलाही शाह आदी उपस्थित होते.यावेळी अशरफ म्हणाले, पालकांनी विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी विचारात घेऊन त्यांचा कलदेखील जाणून घेणे गरजेचे आहे. केवळ आपले मत आणि विचार त्यांच्यावर थोपवून चालणार नाही तर त्यांच्या मनातील स्वप्नही समजून घ्यायला हवे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव करण्यात आला.विद्यार्थ्यांनी आपल्यामधील क्षमता ओळखून ध्येय निश्चित करावे आणि त्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करावा. पालकांनी शिक्षणासोबत संस्कारही देणे गरजेचे आहे. त्याशिवाय संस्कारक्षम पिढीची निर्मिती अशक्य असल्याचे ते म्हणाले.
ध्येयप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी बाळगावी जिद्द : एम. एम. अशरफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 11:52 PM