नाशिक शहर व जिल्ह्यातील कोचिंग क्लासचालकांनी विद्यार्थी वर्गात येण्याआधीच संपूर्ण वर्ग सॅनिटाइज करून घेणे, विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक करणे, सर्व विद्यार्थ्यांचे सॅनिटायझरचा वापर अनिवार्य करणे, शिक्षकांना स्वतः सक्तीचा करणे, वेळोवेळी स्वतःची कोरोना टेस्ट करून घेणे, त्याचा रिपोर्ट क्लासमध्ये दर्शनी भागात लावणे, पालकांचे उद्बोधन करणे आदी सूचना संघटनेच्यावतीने देण्यात आल्या आहेत, तसेच संघटनेच्या सभासदांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, उपाध्यक्ष अशोक देशपांडे, कार्याध्यक्ष शशिकांत तिडके, सरचिटणीस लोकेश पारख, खजिनदार अतुल आचळे आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
कोविडसंबंधी सर्व नियमांचे पालन करून स्थानिक प्रशासनास संपूर्ण सहकार्य करण्यात येईल; परंतु आकसबुद्धीने कोणाच्या खोट्या तक्रारीवरून, कोणत्याही क्लासेस संचालकावर कारवाई होऊ नये. महापालिकेच्यावतीने विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मंगल कार्यालये, सार्वजनिक कार्यक्रम, शाळा-कॉलेजेस व क्लासेस परिसरावर प्रशासनाचे विशेष लक्ष आहे म्हणून संघटनेतर्फे विशेष बैठक घेऊन, शहर व जिल्ह्यातील सर्व कोचिंग क्लासेस संचालकांना प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-जयंत मुळे, अध्यक्ष, कोचिंग क्लासेस संचालक संघटना.