मालेगाव : शासकीय अधिकारी होण्यासाठी खूप पैसा लागत नाही. मात्र, जिद्द, मेहनत व अभ्यासाची चिकाटी गरजेची असते. ग्रामीण व त्यातही माळमाथा भागातील विद्यार्थ्यांनी मेहनत व अभ्यास करण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी केले. तालुक्यातील अस्ताने येथील बी. एम. पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक मदानसिंग देवरे यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभात दिघावकर बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सुधीर तांबे होते. व्यासपीठावर आमदार किशोर दराडे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार, ॲड. शिशिर हिरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते. डॉ. दिघावकर पुढे म्हणाले, कोरडवाहू, माळरान जमीन असणाऱ्या शेतकरी पाल्यांना तर शिक्षणाशिवाय काही पर्याय नाही. शिक्षण सुरू असताना त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवावी. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासन सेवेत जाण्याची तयारी करावी. मेहनत व जीवापाड अभ्यासाची तयारी असेल शेतकरी पाल्यांना चांगले दिवस येतील. शिक्षण पूर्ण केलेले असेल तर निराश होण्याची गरज नाही, प्रयत्नांची पराकाष्ठा करा, स्पर्धा परीक्षांसंदर्भात काही अडचण असेल तर आपली मार्गदर्शनाची तयारी असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी अस्ताने व परिसरातील ग्रामस्थांतर्फे डॉ. दिघावकर यांचा सत्कार करण्यात आला.
शासकीय अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 5:50 AM