लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : हैदराबाद व उन्नाव येथे महिला अत्याचाराच्या घटना पाहता बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी कायद्यात तरतूद करावी यासह अन्य मागण्यांसाठी शनिवारी मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांचा शहरातून मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शिक्षकांनी राष्टÑीय एकतेची व बलात्काराच्या घटनांना थारा न देण्याची शपथ घेतली.
सकाळी ८ वाजता रावसाहेब थोरात सभागृहापासून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात इयत्ता पाचवी ते सहावीपर्यंतचे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. त्यांच्या हातात विविध घोषणा लिहिलेले फलक होते. त्यात ‘आवाज चढवू आणखी वरती, छेडछाडीला देऊ मूठमाती’, ‘महिलांचा आदर करू, बरोबरीचा दर्जा देऊ’, ‘माणूसकी जपूया, मर्दानगी सोडूया’ असा मजकूर होता. मोर्चाचे नेतृत्व मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, आमदार देवयानी फरांदे यांनी केले. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे विसर्जित करण्यात आला. तत्पूर्वी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, महिलांवर अत्याचाराच्या घटना अधिक असून, त्यामानाने शिक्षेचे प्रमाण अतिशय कमी आहे. पोलीस तपासात होणारा विलंबदेखील तितकाच जबाबदार असून, महिलांवरील अत्याचार ही राष्टÑीय समस्या झाली असून, मानवी हक्क संरक्षणास काही बाबतीत अतिरिक्त प्राधान्य देण्यात आल्यामुळे न्यायालयाचा उदारमतवादी दृष्टिकोनही त्यास कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी अशा प्रकारचे सर्व खटले जलदगती न्यायालयात चालविले जावेत, शिक्षेच्या स्वरूपात बदल करावा, अमली पदार्थांच्या वापर, विक्रीवर बंधने आणावीत, शाळा, महाविद्यालयीन परिसरात विनावर्दी पोलीस असावेत, महिलांसाठी सार्वजनिक जागा तसेच सडक सुरक्षेचा विचार व्हावा, पडित महिलांना नुकसान भरपाई दिली जावी, महिलांकडे पाहण्याच्या मानसिकतेत बदल व्हावा, शाळा, महाविद्यालयांमध्ये शासनाच्या खर्चाने स्वसंरक्षणाचे धडे दिले जावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी मोर्चातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात देण्यात आली.