नाशिक : विधी शाखेच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी रविवारी (दि.१७) इंदिरानगर परिसरातील आयटी पार्क येथे सामाईक प्रवेश परीक्षा दिली. वकील होण्यासाठी कायदेविषयक माहिती आणि सामान्यज्ञान विषयाचा अभ्यास करून सीईटीला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची गणिताचे प्रश्न सोडविताना मात्र दमछाक झाली. त्याचप्रमाणे सामान्यज्ञानाचे प्रश्नही कसोटी घेणारे असल्याने बहुतेक विद्यार्थ्यांना ही परीक्षा अवघड गेली. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तीन वर्षांच्या विधी शाखेतील पदवी अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा घेण्यात आली. नाशिक शहरात शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहोचण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या आसनक्षमतेअभावी शहरात वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली. दोन तासांच्या या परीक्षेत दीडशे गुणांचे बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते. परंतु यावर्षी विधी शाखेच्या प्रवेश परीक्षेची काठिन्य पातळी वाढविण्यात आल्याने बहुतांशी विद्यार्थ्यांनी परीक्षा अवघड गेल्याची प्रतिक्रिया नोंदवली. या परीक्षेत कायदेविषयक प्रश्नांना ३० गुण, सामान्यज्ञान व चालू घडामोडीविषयक प्रश्नांना ४० गुण, तार्किक प्रश्नांना ३० गुण व इंग्रजीसाठी ५० गुण असलेल्या एकूण दीडशे गुणांच्या या परीक्षेसाठी दोन तासांचा वेळ देण्यात आला होता. परंतु अनेकांना निर्धारित वेळेत प्रश्नांची उत्तरे देता आली नाही. तर काही विद्यार्थ्यांनी निगेटीव्ह मार्किंग पद्धत नसल्याने ठोकताळ्यांवर आधारित उत्तरे दिली. गणिताचे प्रश्न सोडविताना ही पद्धतही कामी आली नसल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
एलएलबी सीईटीत विद्यार्थ्यांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:35 AM