सिन्नर : जमिनीवरून विमान हवेत नेमके झेपावते कसे, असा चिमुकल्यांना नेहमी पडणारा प्रश्न आणि त्याच उत्तराची भूक भागविण्यासाठी शिक्षकांकडून पारंपरिक पद्धतीने दिले जाणारे उत्तर मात्र त्यांचे कुतहूल शमविण्यास पुरेसे ठरत नाही. त्यामुळेच घोटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची क्षेत्रभेट घडवून आणत विद्यार्थ्यांना विमान उड्डाणांची प्रत्यक्ष अनुभूती दिली.विमानांची उड्डाणे पाहून काही दिवसांपासून पडलेल्या विमान उड्डाणाच्या प्रश्नांचे उत्तर मिळाल्याने चिमुकल्यांनीही भविष्यात पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगण्याची भरारी घेतल्याचे त्यांच्या प्रसन्न चेहऱ्यावरून दिसून आले.विमानतळ, विमानाचे उड्डाणासह प्रसादालयातील स्नेहभोजन, साईबाबा समाधी दर्शन, शिवसृष्टी, पक्षी संग्रहालय, मत्स्यालय, गोशाळा भेटीचा प्रत्यक्ष अनुभव घेत चिमुकल्यांनी आनंदाची लयलूट केली. प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांची क्षेत्रभेट नुकतीच शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ व तीर्थक्षेत्र शिर्डी येथे पार पडली. ही क्षेत्रभेट वैज्ञानिक व आध्यात्मिक दृष्टिकोन, पशुपक्ष्यांविषयी प्रेम, ऐतिहासिक ज्ञान, परस्पर सहकार्य व प्रेम निर्माण करणारी ठरली. विद्यार्थ्यांना प्रारंभी शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ व परिसर दाखिवण्यात आला. एरवी उत्सुकतेने आकाशात उडणारे विमान पाहणारे चिमुकले प्रत्यक्ष विमान व विमानाचे उड्डाण पाहून आनंदून गेले. विमानतळावरील अधिकारी वर्गाने मार्गदर्शन करत माहिती दिली. विमानतळाहून शिर्डीकडे मार्गस्थ होताना नांदुर्खी गावात शिक्षक सोनाली शिंदे व शरद काकडे यांनी सर्व १११ विद्यार्थ्यांना आईस्क्रीमची मेजवानी देत चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित केला. प्रसादालयात सर्वांनी शांततेत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. अध्यात्माला विज्ञानाची जोडप्रसादालयाजवळील शिवसृष्टीला भेट देत विद्यार्थ्यांनी शिवकालीन, ऐतिहासिक तलवारी, हत्यारांची पाहणी करत त्यांची माहिती जाणून घेतली. साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. साई पालखी निवारा येथील मत्स्यालय, पक्षी संग्रहालय, गोशाळेस भेट दिली. यातून विद्यार्थ्यांमध्ये प्राणिप्रेम निर्माण होण्यास मदत होणार आहे. पालखी निवारा परिसरात मोकळ्या मैदानात विद्यार्थी मनसोक्त बागडल्यानंतर पालखी निवारा समूहाकडून देण्यात आलेल्या सोनपापडी व फरसाणवर श्रमपरिहार करण्यात आला. अध्यात्माला विज्ञानाची जोड देण्याचा शिक्षकांचा हा प्रयत्न ग्रामस्थांना अधिक भावला.