लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव कॅम्प : येथील संगमेश्वरातील ज्योती नगर भागात राहणारी भाग्यश्री दिलीप विसपुते या विद्यार्थिनींने केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएस्सी) परीक्षेत यश पटकावले आहे. देशात १०३ तर राज्यात चौथ्या क्रमांकाचे गुण मिळवीत उत्तीर्ण झाली आहे. विसपुते हिच्या यशामुळे मालेगावच्या नावलौकीकात भर पडली आहे.येथील सराफ व्यापारी दिलीप विसपुते व सौ. किरण विसपुते यांची भाग्यश्री ही कन्या आहे. भाग्यश्रीचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण येथील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम मध्ये झाले तर १२वी पर्यंतचे शिक्षण काकाणी विद्यालयात झाले. एसपीएच महाविद्यालयात बी. फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दिल्ली येथे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास केला. गेल्या तीन वर्षांपासून भाग्यश्री दिल्ली येथे अभ्यास करीत होती. यंदाच्या परीक्षेत तिला घवघवीत यश मिळाले आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.सिन्नरकरांचा दबदबा कायमसिन्नर/गुळवंच : केंद्रीय लोकसेवा आयोगाने डिसेंबर २०१६ मध्ये घेतलेल्या लेखी परीक्षेनंतर मार्च ते मे २०१७ मध्ये झालेल्या तोंडी परिक्षेचे निकाल बुधवारी जाहीर केले. त्यात सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील निवृत्ती सोमनाथ आव्हाड यांनी (७०६ रॅँक) यश मिळवले. सिन्नर तालुक्याने यूपीएससी परीक्षेत आपला दबदबा कायम राखला. यूपीएससी परीक्षेत यापूर्वी सिन्नर तालुक्यातील शेखर देशमुख, भारत आंधळे, महेेंद्र पंडीत, संदीप महात्मे, रवींद्र खताळे यांनी यश मिळविले आहे. गुळवंच येथील निवृत्ती सोमनाथ आव्हाड या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने दैदिप्यमान कामगिरी करीत सिन्नरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. गुळवंच येथील निवृत्ती आव्हाड यांचे प्राथमिक शिक्षण निमगाव येथे झाले. त्यानंतर बारागाव पिंप्री येथे माध्यमिक शिक्षण घेतले. सिन्नर महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर पुणे येथील सिंहगड महाविद्यालयात बी. ई. मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उडीसा येथे एस. आर. स्टील कारखान्यात दोन वर्षे नोकरी केली. मात्र स्पर्धा परिक्षा देवून अधिकारी होण्याची निवृत्ती आव्हाड यांची इच्छा होती.गेल्यावर्षी आव्हाड यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळविले. त्यांची मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली होती. मात्र नोकरीवर रुजू न होता आव्हाड यांनी रजा घेत दिल्ली येथे यूपीएससीची तयारी सुरु केली होती. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आव्हाड यांनी एकाग्रतेने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करीत ७०६ रॅँक मिळवून यश मिळवले. निवृत्ती आव्हाड यांनी केद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविल्याने गुळवंच येथे मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी जल्लोष केला.
युपीएससीत जिल्ह्याचे विद्यार्थी चमकले
By admin | Published: June 02, 2017 1:03 AM