नाशिक : समाजात राहून सामाजिक काम करण्यासाठी तरुणांची पिढी तयार व्हावी आणि त्यातूनच रोजगाराच्या संधीदेखील मिळाव्यात यासाठी समाजकार्य महाविद्यालयांची रचना बदलण्यात येणार आहे. समाजकार्य महाविद्यालये केवळ पदवीधर महाविद्यालये बनू पाहत असल्याने आता त्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
समाजात राहून सामाजिक कार्यात सक्रिय होणारे समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या समाजकार्य महाविद्यालयांच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात असून, केवळ पदवीधर होण्याचे शिक्षण म्हणूनच याकडे पाहिले जात असल्याची बाब समोर आल्याने आता समाजकार्य महाविद्यालयाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या महाविद्यालयांचा जुना झालेला अभ्यासक्रम बदलण्यात येत असून, त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नुकतीच सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेतली. आता या महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची ऑनलाइन कार्यशाळा होत आहे.
राज्यात एकूण ५४ समाजकार्य महाविद्यालये आहेत. ‘बॅचलर ऑफ सोशल वर्क’ पदवी व ‘मास्टर ऑफ सोशल वर्क’ हे पदव्युत्तर शिक्षण तिथे दिले जाते. समाजात राहून सामाजिक काम करणारे युवक तयार व्हावेत, यासाठी या महाविद्यालयांची स्थापना झाली. मात्र, आता तो उद्देश बाजूला पडला असून, केवळ काहीतरी पदवी मिळवायची म्हणूनच या महाविद्यालयांकडे पाहिले जात आहे. शासन आणि समाज संस्था यांच्यातील दुवा अशी व्यापक संकल्पना आणि त्या अनुषंगाने मोठी संधी असतानाही महाविद्यालयांमधून अशा प्रकारचे शिक्षण प्रभावी ठरत नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
त्यामुळे समाजकार्य महाविद्यालयाची रचना आणि अभ्यासक्रम यांच्यात आगामी काळात आमूलाग्र बदल होऊ घातला आहे. त्यानुषंगाने कार्यवाही सुरू झालेली आहे. यात प्रामुख्याने विद्यार्थी एखाद्या उद्योगाबरोबर, मोठ्या प्रकल्पाबरोबर जोडून देण्यात येतील, कामगार, प्रकल्पबाधित यांच्याशी उद्योगाच्या, सरकारच्या वतीने संवाद साधणे, त्यांच्यासाठी नव्या योजना तयार करणे, असे काम कार्यानुभव म्हणून विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येणार आहे. याशिवाय वंचित, उपेक्षित लोकसमूहाशी संवाध साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेऊन सरकारसमोर आणणे, कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व फंडाचा (सीएसआर) वापर रचनात्मक कामांसाठी करणे, अशी कामेही त्यांना अभ्यासक्रमात शिकवण्यात येणार आहे.
--कोट--
समाज आणि सरकार, उद्योग आणि कर्मचारी प्रकल्प तसेच बाधित यांच्यातील दुवा म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना व घेतल्यानंतरही कार्यरत व्हावे हे अपेक्षित आहे. यातूनच नोकरी संधीदेखील उपलब्ध होणार आहे. समाजकार्य महाविद्यालये शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे.
- प्रशांत नारनवरे, समाजकल्याण आयुक्त
--इन्फो--