थेरगाव, दि. 25 - पडवळनगर येथील प्रजापती चाळीमध्ये पंतग उडवताना मांजा उच्च दाबाच्या वीजवाहक तारांमध्ये अडकल्याने मोठा स्फोट झाला. या स्फोटात तीन मुले भाजून जखमी झाली आहेत. त्यातील अक्षय प्रजापती (वय ११) हा गंभीर जखमी झाला आहे.
अक्षय व त्याचे मित्र सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घरासमोरील टेरेसवरील बाल्कनीत पतंग उडवत होते. पतंगाचा मांजा इमारती वरून जाणा-या उच्च दाबाच्या वीजवाहक तारांमध्ये अडकला. त्यामुळे त्या ठिकाणी मोठा स्फोट झाला. त्यात अक्षय सह दोन मुले जखमी झाली आहेत. अक्षय हा गंभीर भाजला गेल्याने त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर इमारतीतील सर्व सदनिकांचे विद्युत मीटर जळाले. काही जणांचे दूरचित्रवाणी संच जळून मोठे नुकसान झाले.
पतंग उडवताना, मांजामुळे विविध ठिकाणी अनेक दुर्घटना घडल्या. पिंपरी चिंचवड शहर सुद्धा त्यास अपवाद राहिले नाही. उच्चदाब विद्युत तारांवर पतंगाचा मांजा अडकल्याने स्फोट झाला. स्फोटाच्या ठिणग्या खाली पडून काही नागरिकांचे घराजवळ ठेवेलेल साहित्य जळाले. घरापुढे सुकण्यासाठी ठेवलेले कपडे जळाले.