त्र्यंबकेश्वर : दोन वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात झाले. मात्र उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधा येथे मिळत नसल्याने रुग्णांची परवड होत आहे. त्यांना नाशिक येथे उपचारासाठी जावे लागत आहे. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर तालुका जाहीर जवळपास १८ वर्षे झाली. त्यात २००३-०४ चा पहिला सिंहस्थ पार पडला. त्र्यंबकेश्वर शहराची लोकसंख्या वाढली आहे. आजूबाजूला निवासी वसाहती वाढल्या आहेत. परिसरातील, गावातील लोकांचा त्र्यंबकेश्वरला राबता वाढला आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग असे सरकारी कार्यालये येथे असल्याने तालुक्यातील दररोजच शेकडो लोक कामानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे येतात. याशिवाय नाशिक-त्र्यंबकेश्वर या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. साहजिकच अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे. परिसरातील रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, तर त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातात. व सुविधा उपलब्ध नसल्याने रुणांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठविले जाते. मग ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करण्याचे कारणच काय, असा सवाल तालुक्यातील जनताने केला आहे. सन २०१५-१६च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर झाले. त्र्यंबकेश्वरचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर आहे; मात्र अद्याप त्यासाठी आवश्यक कर्मचारी वर्ग दिला गेलेला नाही. यंत्र साधनसामग्री नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा काहीच उपयोग होत नाही. सोनोग्राफी, एमआयआर, काही शस्त्रक्रिया या उपजिल्हा रुग्णालयात होऊ शकतात. याशिवाय वैद्यकीय अधीक्षकाव्यतिरिक्त आठ ते दहा वैद्यकीय अधिकारी, १० ते १५ स्टाफ नर्स यांचा समावेश असेल. खऱ्या अर्थाने ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात होत नाही. रुपांतरही झाले पण अंमलबजावणी मात्र दोन वर्षांनंतरही झाली नाही, त्यामुळेच उपजिल्हा रुग्णालय म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी गत झाली आहे. (वार्ताहर)
उपजिल्हा रुग्णालय ‘सलाईन’वर
By admin | Published: May 24, 2016 11:01 PM