नाशिक : शासकीय सेवेतील वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचे शासन दरबारी प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य लघुवेतन सहकारी कर्मचारी संघाच्या नाशिक जिल्हा शाखेचे अध्यक्ष अजिज शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यात प्रामुख्याने राज्यातील वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू करण्यात यावा, सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करावा, अनुकंपा तत्त्वावरील भरती विना अट तत्काळ सुरू करावी, अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनीच पेन्शन योजना लागू करावी, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जॉर्इंट कौन्सिलची सभा पूर्ववत घ्यावी, गणवेश भत्ता व शिलाई भत्त्यात वाढ करावी, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, पदोन्नतीने रिक्त झालेली पदे तत्काळ भरण्यात यावीत, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक बंद करावी आदि मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. आंदोलनात राजाराम अहिरे, चंदनकुमार परमानंद सिंग, दीपक ससाणे, एस. आर. तिवडे, सुनील रनाळकर, जे. बी. अहिरे, ए. रा. पठाण, राजू सूर्यवंशी, कि. तु. सानप, सीताबाई मोहिते आदि कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
लघुवेतन कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By admin | Published: March 25, 2017 12:29 AM