मालेगाव मध्य : शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख (३५) यांच्या आत्महत्येप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पत्नी, सासरे यांच्यासह सुमारे १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यात जळगाव जिल्ह्यातील दोन पोलीस कर्मचारी व एका शिक्षकाचा समावेश आहे.गत ११ एप्रिल रोजी अजहर हुस्न्नोदीन शेख यांनी पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील महिला समुपदेशन कार्यालयासमोरच सायंकाळी पाचच्या सुमारास स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधुन डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. आरती सिंह यांच्या उपस्थितीत सुसंवाद सभागृहात बैठक सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने पोलीस दलास धक्काच बसला होता. विशेष पोलीस उपमहानिरीक्षक छेरींग दोर्ज यांनीही भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंभाने अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु होता. मात्र त्यानंतर शहरात कोरोनाने थैमान घातल्याने पोलीसांवरील ताण वाढला होता. याबाबत शेख यांचे वडील हुस्न्नोदीन अब्दुल कादर रा. जळगाव यांनी गुरूवारी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, मयत शेख याची पत्नी मिसबा व तिच्या कुटुंबियांकडून शेख यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यातील खर्च, वकीलाची फी व शालकाच्या कॅन्सरच्या उपचारासाठी ७ लाखांची मागणी करीत होते. पैसे न दिल्यास संशयितांकडून पत्नीस तु गळफास घेऊन फिर्यादीचे कुटुंबाच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेव अशी धमकी वारंवार शेख व त्यांच्या कुटुंबियांना देऊन शिविगाळ करीत असत. त्यास कंटाळुन मरणास प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत कडूकार करीत आहे.याप्रकरणी सासरे एकबाल गयासोद्दीन शेख, रिजवान लतीफ शेख (पोलीस), रमीज शकील सय्यद (पोलीस), शोराब लतीफ शेख, आफान शाकीर शेख, यास्मीन शाकीर शेख, शाकीर अहमद शेख, साबेर एकबाल शेख, परवीन शकील सय्यद, अमन एकबाल सय्यद, मोनीस एकबाल शेख व पत्नी मिसबाह अजहर शेख रा. सर्व जळगाव यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपनिरीक्षक आत्महत्येप्रकरणी पत्नीसह १५ जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 9:23 PM