नाशिक : संपूर्ण राज्यातील भूमी अभिलेख कार्यालयांचे क्रिकेट सामने आयोजित करून तब्बल पाच दिवस नागरिकांना वेठीस धरणारे नाशिक विभागाचे उपसंचालक हिरालाल मोरे यांची शासनाने तडकाफडकी बदली केल्याचे वृत्त असून, त्यांच्या जागी पुणे येथील किशोर तवरेज यांनी पदभार स्वीकारला आहे़ क्रिकेट सामने बघण्यासाठी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी गेल्याने कार्यालयातील शुकशुकाटाची छायाचित्रे ‘लोकमत’ने मंगळवारी (दि़९) प्रसिद्ध केली होती़ तसेच अखिल भारतीय जनजागृती दक्षता संस्थेने जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती़दक्षता अभियान संस्थेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनानुसार क्रिकेट स्पर्धेसाठी भूमी अभिलेखचे उपसंचालक हिरालाल मोरे, जिल्हा अधीक्षक अनिल माने, नगरभूमापन अधिकारी तुषार पाटील, कार्यालय अधीक्षक सुनील वाणी, उपअधीक्षक भगवान भोये हे सर्व कर्मचाऱ्यांसह २ ते ६ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या कालावधीत कार्यालय उघडे ठेवून गेले होते़ कार्यालयातील अतिसंवेदनशील फाईल्स, नकाशे, रेकॉर्ड्स उघड्यावर सोडून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान या अधिकाऱ्यांनी केले असून, या कालावधीत सर्वसामान्यांची गैरसोय झाली आहे़या सर्व अधिकाऱ्यांवर निलंबनासह बडतर्फीची कारवाई करण्याची मागणीही दक्षता अभियान संस्थेने केली होती़ शासनाने ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन मोरे यांची तडकाफडकी बदली केल्याचे वृत्त आहे़ याबाबत अधिक माहिती देण्यास अधीक्षक सुनील वाणी यांनी नकार दिला आहे़ दरम्यान, क्रिकेटच्या नावाखाली पाच दिवस गायब होणारे कर्मचारी मंगळवारी (दि़९) रात्री साडेसात वाजेपर्यंत काम करीत होते़ (प्रतिनिधी)
भूमी अभिलेखच्या उपसंचालकांची बदली
By admin | Published: February 10, 2016 11:53 PM