सिन्नर : दस्ताच्या नकला देण्याच्या बदल्यात स्वीकारली लाचसिन्नर : दोन वर्षांपूर्वीच्या दस्ताच्यार् ं(खरेदीखताच्या) नकला देण्याच्या बदल्यात १ हजार रुपयांची लाच मध्यस्थामार्फत स्वीकारताना सिन्नरचे दुय्यम निबंधक अशोक नामदेव गायकवाड याच्यासह अन्य एका खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरूहोते. तक्रारदाराच्या भावाने दोन वर्षांपूर्वी निऱ्हाळे शिवारातील गट क्रमांक ५७२ मध्ये खरेदी केली होती. तक्रारदारास दस्त क्रमांक ७६१३ व ७७१३/१२ यांच्या नकला न्यायालयीन कामासाठी गरजेच्या होत्या. त्यासाठी तक्रारदाराने सिन्नरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज केला होता. दुय्यम निबंधक अशोक गायकवाड याने अर्जदारास शशिकांत सुभाष कालेकर या कार्यालयात बसणाऱ्या खासगी व्यक्तीस भेटण्यास सांगितले होते. कालेकर याच्याकडे अर्ज दिल्यानंतर त्याने अर्जाची पोहोच दिली नव्हती. सदर नक्कल देण्याच्या बदल्यात १ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने दूरध्वनीहून २३ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीत तथ्य आहे की नाही याची खातरजमा करून घेतली होती. मंगळवारी यासाठी पंचामार्फत सापळा रचण्यात आला होता; मात्र कालेकर कामानिमित्त परगावी होता. बुधवारी कार्यालयास सुटी होती. त्यामुळे गुरुवारी पुन्हा सापळा रचण्यात आला. गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास कालेकर याने दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रारदाराला दस्त्यांची सत्यप्रत (नक्कल) देऊन त्याच्याकडून १ हजार रुपये स्वीकारले. याचवेळी दबा धरून बसलेल्या लाचलुचपत खात्याच्या कर्मचाऱ्यांनी कालेकर व दुय्यम निबंधक अशोक गायकवाड यास ताब्यात घेतले. (वार्ताहर)
दुय्यम निबंधकाला लाच घेताना अटक
By admin | Published: November 26, 2015 11:28 PM