सटाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये उत्तर महाराष्टÑातून एकमेव मंत्रिपद मिळविणारे डॉ. सुभाष भामरे हे धुळे लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा नशीब आजमावत असून मंत्रिपदामुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या या लढतीत भामरे यांच्यासमोर मतविभागणीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यंदा मोदी लाटेचा फारसा परिणाम दिसून येत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळविताना भामरे यांची कसोटी लागणार आहे. भाजपचे डॉ. सुभाष भामरे आणि कॉँग्रेसचे कुणाल पाटील यांच्यातच मुख्य लढत बघायला मिळत असून अन्य उमेदवारांच्या मतविभागणीचा फायदा कुणाला होतो, याबाबत औत्सुक्य वाढले आहे.धुळे मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य आणि बागलाण विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. धुळे मतदारसंघात एकूण १८ लाख ७४ हजार मतदार असून, त्यात मालेगाव मध्य मतदारसंघात २ लाख ८१ हजार, मालेगाव बाह्य मतदारसंघात ३ लाख ३२ हजार, तर बागलाण मतदारसंघात २ लाख ७२ हजार मतदार आहेत. धुळे मतदारसंघात सर्वाधिक मतदार धुळे ग्रामीण मतदारसंघात ३ लाख ६३ हजारइतके आहेत. त्याखालोखाल मालेगाव बाह्य मतदारसंघाचा क्रमांक लागतो.जिल्ह्यातील तीनही मतदारसंघातील मताधिक्य हे नेहमीच निर्णायक ठरत आले आहे. धुळे मतदारसंघात यंदा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत. त्यांच्यासमोर कॉँग्रेसचे कुणाल पाटील यांनी तगडे आव्हान उभे केले आहे, तर लोकसंग्राम पक्षातर्फे भाजपचे बंडखोर अनिल गोटे यांनीही युती-आघाडीला लक्ष्य केले आहे. धुळे महापालिकेत भाजपने यंदा दणदणीत यश मिळविले असल्याने भाजपची मदार शहरी भागावर अधिक असणार आहे. याचबरोबर बागलाण मतदारसंघही गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपला साथ देत आला आहे. त्यामुळे बागलाण मतदारसंघातून मताधिक्य मिळविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ लागली आहे. युती-आघाडीच्या उमेदवारांनी त्यादृष्टीने जिल्ह्यातील तीनही मतदारसंघाकडे लक्ष पुरविले आहे. केंद्रात मंत्रिपद असल्याने डॉ. भामरे यांच्यासाठी यंदाची लढत अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत जाऊन पोहोचताना त्यांची दमछाक होताना दिसून येत आहे. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजपचे डॉ. भामरे यांनी ५ लाखांहून अधिक मते घेतली होती तर प्रतिस्पर्धी कॉँग्रेसचे उमेदवार अमरिशभाई पटेल यांना ३ लाख ९८ हजार मते मिळाली होती. २०१४ मध्ये निवडणूक रिंगणात १९ उमेदवार होते यंदा मात्र २८ उमेदवार निवडणुकीत लढत देत आहेत. त्यामुळे मतविभागणी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. अनिल गोटे हेसुद्धा कुणाला मारक ठरतात, हे पाहणेसुद्धा औत्सुक्याचे ठरणार आहे.प्रचारात विकासाच्या मुद्द्यांवर भरधुळे लोकसभा मतदारसंघात प्रचारात प्रामुख्याने रोजगार, एमआयडीसीचा प्रलंबित प्रश्न, मालेगाव येथील पावरलूमधारकांचे प्रश्न, मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग, कनोली धरणातील पाणीपुरवठा योजना आदी मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत. याशिवाय सटाणा शहरासाठी पुनंद प्रकल्पातून नेण्यात येणाºया थेट जलवाहिनीचाही मुद्दा प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत.
मंत्रिपदामुळे सुभाष भामरे यांची प्रतिष्ठा पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:19 AM