नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण, विधी, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य आणि शहर सुधारणा या चारही विषय समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदासाठी गुरुवारी (दि.२६) निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. चारही विषय समित्यांसाठी एकेक उमेदवारी अर्ज आल्याने सभापती-उपसभापतींची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. विषय समित्यांवर भाजपाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.अपर आयुक्त जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विषय समित्यांच्या सभापती-उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदी कावेरी घुगे, तर उपसभापती पदी सीमा ताजणे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. कावेरी घुगे यांना उपसभापतिपदावरून सभापतिपदी बढती मिळाली आहे तर सीमा ताजणे यांना मागील वर्षी स्थायी समितीवर सदस्य म्हणून संधी देण्यात आलेली होती. वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीच्या सभापतिपदाची माळ सलग दुसऱ्यांदा ज्येष्ठ सदस्य सतीश कुलकर्णी यांच्या गळ्यात पडली आहे तर उपसभापतिपदी पल्लवी पाटील यांची वर्णी लावण्यात आली आहे. सतीश कुलकर्णी यांनी स्वत:हून सदर पद मागवून घेतल्याचे सांगितले जाते. विधी समितीच्या सभापतिपदी सुनीता पिंगळे यांची, तर उपसभापतिपदी सुमन सातभाई यांची निवड झाली आहे. सुनीता पिंगळे यांनाही मागील वर्षी स्थायीवर सदस्य म्हणून संधी देण्यात आली होती, तर सुमन सातभाई यांच्याकडे नाशिकरोड प्रभाग समितीचे सभापतिपद होते. शहर सुधारणा समितीच्या सभापतिपदी पूनम सोनवणे, तर उपसभापतिपदी अंबादास पगारे यांची निवड घोषित करण्यात आली आहे. दरम्यान, नवनिर्वाचित सभापती-उपसभापती यांचा सत्कार महापौर रंजना भानसी व स्थायी समिती सभापती हिमगौरी अहेर यांच्या हस्ते करण्यात आला.
विषय समिती सभापती-उपसभापती निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 6:54 PM
नाशिक महापालिका : चारही विषय समित्यांवर भाजपाचे वर्चस्व
ठळक मुद्देचारही विषय समित्यांसाठी एकेक उमेदवारी अर्ज आल्याने सभापती-उपसभापतींची निवड बिनविरोध घोषित अपर आयुक्त जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विषय समित्यांच्या सभापती-उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली