नाशिक - महापालिकेतील चारही विषय समित्यांवर सदस्यपदांच्या नियुक्त्या करताना शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत गिते, आमदार अपूर्व हिरे आणि सभागृहनेता दिनकर पाटील यांच्या समर्थकांची वर्णी लावण्यात आली आहे. एकूण २० पैकी ९ सदस्य हे बाळासाहेब सानप यांच्या पूर्व विधानसभा मतदारसंघातील असून आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या समर्थकांना त्यातून डावलल्याचे चित्र आहे. त्यामुळे, सत्ताधारी भाजपातील तिनही आमदारांमधील परस्परविरोधी संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या चारही विषय समित्यांवर भाजपाचे वर्चस्व आहे. प्रत्येक विषय समितीवर भाजपाचे प्रत्येकी पाच सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण २० सदस्यांमध्ये सर्वाधिक ९ सदस्य हे आमदार बाळासाहेब सानप यांच्या पूर्व विधानसभा मतदारसंघातील अथवा सीमारेषेवरील आहेत. त्यात, शितल माळोदे, सिमा ताजणे, पूनम सोनवणे, अंबादास पगारे, रूची कुंभारकर, हेमंत शेट्टी, संगिता गायकवाड, सुनीता पिंगळे, अनिता सातभाई यांचा समावेश आहे. त्याखालोखाल नाशिक पश्चिम मतदारसंघातील हेमलता कांडेकर, रविंद्र धिवरे व वर्षा भालेराव हे सदस्य सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या प्रभागातील असून ते पाटील समर्थक आहेत तर कावेरी घुगे या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थक मानल्या जातात. प्रतिभा पवार, पल्लवी पाटील आणि नीलेश ठाकरे हे आमदार अपूर्व हिरे यांचे समर्थक मानले जातात. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील अर्चना थोरात, सुमन भालेराव हे माजी आमदार वसंत गिते यांचे समर्थक आहेत. सतिश कुलकर्णी व दीपाली कुलकर्णी हे पूर्वी आमदार फरांदे यांचे समर्थक मानले जायचे. परंतु, सतीश कुलकर्णी यांची झालेली उपेक्षा आणि दीपाली कुलकर्णी यांच्या वाहनाच्या झालेली तोडफोड प्रकरणी समोर आलेल्या राजकारणामुळे ते फरांदे यांच्यापासून दुरावल्याची चर्चा आहे. विषय समित्यांवर सदस्यांच्या नियुक्त्या करताना बाळासाहेब सानप यांनी आपल्या मतदारसंघाकडे पुरेपुर लक्ष पुरविल्याची चर्चा सत्ताधारी भाजपातीलच नाराजांमध्ये रंगली आहे. नियुक्त्यांमध्ये जाणीवपूर्वक आमदार फरांदे व आमदार सीमा हिरे यांच्याही समर्थक नगरसेवकांना डावलले गेल्याची भावना आहे. त्यातच, काही सदस्यांना मागील वर्षी संधी दिलेली असताना त्यांची पुन्हा एकदा वर्णी लावण्यात आल्याने असंतोष वाढला आहे. कावेरी घुगे यांना महिला व बालकल्याणच्या उपसभापतीपदावरून सभापतीपदी बढती देण्यात आली आहे. सतिश कुलकर्णी यांच्या गळ्यात सलग दुसऱ्यांदा सभापतीपदाची माळ टाकली आहे तर सुनीता पिंगळे यांची मागील वर्षी स्थायीवर वर्णी लावण्यात आलेली असताना त्यांना विधी समिती सभापतीपदी विराजमान केले आहे. अनिता सातभाई या यापूर्वी नाशिकरोड प्रभाग सभापती होत्या. त्यांना आता विधी समितीचे उपसभापतीपद दिले आहे.
विषय समित्यांवर आमदार हिरे-फरांदे समर्थकांना डावलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 3:06 PM
नाशिक महापालिका : आमदार सानप-गिते-पाटील समर्थक नगरसेवकांची वर्णी
ठळक मुद्देएकूण २० पैकी ९ सदस्य हे बाळासाहेब सानप यांच्या पूर्व विधानसभा मतदारसंघातील काही सदस्यांना मागील वर्षी संधी दिलेली असताना त्यांची पुन्हा एकदा वर्णी लावण्यात आल्याने असंतोष