नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील ५५ बालमृत्यू झाल्याच्या गंभीर प्रश्नावर हे बालमृत्यू ग्रामीण भागातील असतील, तर त्याची कारणे व त्यासंदर्भात केलेल्या नियोजनाचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे आदेश अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिली.मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांची यासंदर्भात तातडीची बैठक बुधवारी (दि.१३) सभागृहात बोलविली होती. या बैठकीस अध्यक्ष शीतल सांगळे, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर, शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी बालमृत्यूच्या गंभीर प्रश्नावर प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रात तसेच अंगणवाड्यांमध्ये नेमके काय नियोजन केले होते. ही बालके जिल्हास्तरावर का आली? या बालकांना वेळेवर पोषण आहारासह आरोग्याच्या सुविधा मिळाल्या होत्या काय? यासह सविस्तर अहवाल येत्या दोन दिवसांत जिल्हा परिषदेला सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर यांनी दिली. तसेच अंगणवाडी स्तरावरील सर्व बालकांची वेळच्या वेळी आरोग्य तपासणी होते काय? होत नसेल तर अडचणी काय आहेत? याबाबतही महिला व बालकल्याण विभागाला आपण सूचना दिल्याचे सांगितले.
बालमृत्यूचे दोन महिन्यांत अहवाल सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 7:28 PM