नाशिक : उपनगर पोलीस ठाण्याला स्थापनेच्या आठ वर्षांनंतर राज्य शासनाकडून उपनगर टपाल कार्यालयासमोरील ११०० चौरस मीटर जागा हस्तांतरित करण्यात आली. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे गेल्या कुंभमेळ्यापूर्वी विभाजन करून २०११ मध्ये उपनगर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. उपनगर पोलीस ठाण्याच्या स्थापनेनंतर उपनगर नाका पोलीस चौकीच्या आवारात कापडी तंबूमध्ये काही दिवस पोलीस ठाण्याचा कारभार सुरू होता. त्यानंतर नेहरूनगर येथील मनपा शाळेच्या इमारतीच्या तळमजल्यावरील जागा उपनगर पोलीस ठाण्याला देण्यात आली. अवघ्या चार खोल्यांमध्ये पोलीस ठाणे असलेल्या उपनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बसण्यास पुरेशी जागा नाही. पोलीस कोठडी, बिनतारी संदेश यंत्रणा आदींसाठी स्वतंत्र जागा नसल्याने तारेवरची कसरत करीत अधिकारी, कर्मचारी पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळत आहे. उपनगर टपाल कार्यालय व म्हसोबा मंदिरासमोरील जागा राज्य शासनाने उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली. भूसंपादन विभागाचे लिट्टे, मंडल अधिकारी सईद शेख, तलाठी वसंत ढुमसे यांनी जागेचे मोजमाप करून रितसर पोलीस ठाण्याच्या जागेचा ताबा दिला.
उपनगर पोलीस ठाण्यासाठी जागा हस्तांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:32 PM