नाशिक : मनापासून स्पर्धा परीक्षांकडे वळणारे परिस्थितीपुढे सहजासहजी नमत नाहीत. स्पर्धा परीक्षांमुळे संघर्ष करण्याची चिकाटी तयार होते आणि हीच स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची चिकाटी ठरवलेले ध्येयही गाठून देते, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. वडाळारोडवरील जेएससीटी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये पोलीस आयुक्तालय, जेएमसीटी, होप फाउंडेशन व लॉस्झ यांच्यातर्फे संयुक्तरीत्या आयोजित ‘स्पर्धा परीक्षांना समोरे जाताना’ परिसंवाद व गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर जेएमसीटी संस्थेचे अध्यक्ष तथा शहर-ए-खतीब हाफीज हिसामोद्दीन, हाजी रउफ पटेल, सचिव जाहीद खातीब, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, माधुरी कांगणे, श्रीकृष्णा कोकाटे, युथ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हाजी बबलु पठाण, तरन्नुम कादरी, होपचे अध्यक्ष रियाज शेख, लॉस्झचे अॅड. डी. एस. राणा, अभिजित खैरनार, शारूख मनियार, सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे आदी उपस्थित होते. दरम्यान, पोलीस आयुक्तांच्या एमपीएससी परीक्षेतून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी निवड झालेले शारुख मनियार व यूपीएससीद्वारे पोलीस उपअधीक्षकपदी निवड झालेले अभिजित खैरनार यांचा सत्कार करण्यात आला. सिंगल म्हणाले, केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांची सविस्तर माहिती घेऊन उमेदवारांनी आपली योजना आखली पाहिजे. यूपीएससीची तयारी करताना सामान्य अध्ययनाचा पायाभूत अभ्यास चांगला झाल्यामुळे इतर परीक्षांना सामोरे जाण्यात विशेष अडचण येत नाही आणि नव्याने अभ्यासही करावा लागत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
चिकाटीमुळे स्पर्धा परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:17 AM