नाशिक : त्र्यंबकेश्वरपासून जवळच असलेल्या दुगारवाडी धबधबा येथे फिरण्यासाठी आलेल्या औरंगाबादच्या एका कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी अनुषा शेट्टी, कोट्टी रेड्डी, गिरिधर सुर्यवंशी हे तीघे धबधब्याखाली नदीच्या पाण्यात मंगळवारी (दि.१७) संध्याकाळी बुडाले. दोघांचे मृतदेह रात्री उशिरापर्यंत शोधकार्य करणाऱ्या पथकाच्या हाती लागले. तीस-या युवकाचा शोधे घेण्यासाठी गुरूवारी सकाळी पुन्हा मोहीम राबविली जाणार आहे.याबाबत जिल्हा पोलीस दलाने दिलेली माहिती अशी, एकूण सहा मित्रमित्रांनी जेव्हा बुधवारी (दि.१८) सकाळी जेव्हा यांच्या मित्रांनी ही बाब परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्र्यंबकेश्वर पोलिसांना कळविली तेव्हा पोलिसांसह त्र्यंबक वनपरिक्षेत्रातील वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दुपारच्या सुमारास एका मुलीचा मृतदेह पाण्यात लांब अंतरावर तरंगताना आढळून आला. त्यामुळे दुपारी अडीच वाजता वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे चांदोरी बचाव पथकाला मृतदेह काढण्यासाठी तसेच बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आले. ‘वैनतेय’ व चांदोरीचे बचाव पथक सुमारे मागील सहा ते सात तासांपासून राबत होते. त्यांना अनुषा शेट्टी व एका मुलाचा मृतदेह हाती लागला असून तीसरा मुलगा अद्याप बेपत्ता असल्याचे अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी सांगितले. रात्रीचा किर्रर्र अंधार पसरल्याने या धबधब्याच्या परिसरात सुरू असलेले शोधकार्य थांबविण्याचे आदेश वालावलकर यांनी दिले आहे.
मुख्य त्र्यंबकेश्वर-जव्हार रस्त्यापासून दुगारवाडी धबधबा साधारणत: दहा किलोमीटर अंतरावर आहे. दुगारवाडी धबधब्यापर्यंतचा पोहचण्याचा मार्ग अत्यंत खडतर व धोकादायक असाच आहे. धबधब्याजवळ जाण्यसाठी सुमारे तीन किलोमीटर खोल दरी पार करावी लागते. आजुबाजूला दाट वृक्षराजी व वन्यप्राण्यांचा वावरही आहे. सध्या धबधबा वाहता नसला तरीदेखील नदीला पाणी असल्यामुळे या निसर्गरम्य परिसराचे हौशी पर्यटकांना वर्षभर आकर्षण असते. त्यामुळे वर्षभर येथे पर्यटक हजेरी लावत असतात. दुगारवाडी धबधब्यावर यापुर्वीदेखील अशाच दुर्घटना घडल्या आहेत. पावसाळ्यातील निसर्गरम्य मात्र अतिसंवेदनशील व धोकादायक असे ठिकाण म्हणून दुगारवाडीची ओळख आहे. धबधब्याजवळ जाण्यासाठी खूप खोल उतरावे लागते.
बुधवारी दुपारी साडेचार वाजेपासून वैनतेय व चांदोरीचे पथक दुगारवाडीच्या डोहाखाली बुडालेल्या युवक-युवतींचा शोध घेत होते. साडेपाच वाजेच्या सुमारास अनुशाचा मृतदेह वैनतेयच्या एका पथकाच्या हाती लागला तर दुसºया युवकाचा मृतदेहन चांदोरीच्या पथकाला रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास आढळून आला. रात्री साडेनऊ वाजता वैनतेयचे दयानंद कोळी, भाऊसाहेब कानमहाले, सतीश कुलकर्णी, चेतन खर्डे, रोहित हिवाळे यांच्या पथकाने अनुशाचा मृतदेह धबधब्यापासून वर आणत रूग्णवाहिकेत ठेवला. त्यानंतर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर पोलीस व चांदोरीच्या शोधकार्य करणाºया बचाव पथकाने एका युवकाचा मृतदेह बाहेर काढला. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. बेपत्ता झालेल्या तीस-या युवकाचा रात्री उशिरापर्यंत शोध लागलेला नसल्याचे घटनास्थळी असलेले बचावपथकाचे प्रमुख, पोलीस अधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.