भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी शिवारात पांढरीवस्ती - चिकणी रोड लगत सजन सीताराम नाईकवाडी यांची वस्ती व शेतजमीन आहे. शेतालगतच त्यांची ८० फूट विहिर आहे. सध्या विहिरीत सहा ते सात फूट पाणी आहे. नाईकवाडी यांचा मुलगा योगेश हा बुधवार (दि.३०) रोजी सकाळी साडेवाजता शेताजवळील विहिरीवरील विद्युतपंप सुरू करण्यासाठी गेला होता. बराच वेळ विद्युतपंप सुरू होत नसल्याने योगेश याने विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला. सुमारे ४० फूट अंतर विहीरीत गेल्यानतंर कपारीत लपवून बसलेल्या बिबट्याने डरकाळी फोडल्याने योगेशची पाचावर धारण बसली. विहीरीतून कसेबसे वरती आल्यानतंर सदरची घटना कुटुंबियांना सांगितली. त्यानतंर विहीरीत बिबट्या पडला असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. सकाळी ९ वाजेच्या सुमारास वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. बी. सोनवणे यांच्यासह वनपाल प्रीतेश सरोदे, अनिल साळवे, वनरक्षक के. आर. इरकर, तानाजी भुजबळ, डी. एन. विघे, आकाश रूपवते आदी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी विहिरीची पाहणी केल्यानतंर विहिरीत छोटा पिंजरा सोडण्यात आला. बराच वेळानंतर बिबट्या पिंजºयात आला. छोट्या पिंज-यातून दोरखंड बांधून बिबट्याला अलगद बाहेर काढण्यात आले. दुपारनतंर बिबट्याला मोहदरी येथील वन उद्यानात दाखल करण्यात आले. पशु वैद्यकीय अधिका-यांनी बिबट्याची तपासणी केली. सुमारे साडेतीन वर्षाचे वय असलेली बिबट्या मादी असल्याचे वन विभागाच्या अधिका-यांनी सांगितले. वन मजूर वसंत आव्हाड, रामनाथ आगिवले, भगवान जाधव, रोहित लोणारे, तुकाराम मेंगाळ आदीसह स्थानिक ग्रामस्थ व पदाधिका-यांनी बिबट्याला वाचविण्यासाठी मदत केली.