नाशिक : प्रत्येक व्यक्तीमध्ये अंतर्गत गुणकौशल्ये असतात आणि त्या जोरावर प्रत्येकात यशस्वी होण्याची क्षमताही असते. त्यामुळे कठीण परिश्रमांची काटेकोर नियोजनाशी योग्य सांगड घातल्यास कोणत्याही क्षेत्रात यशप्राप्ती निश्चित मिळते, असे प्रतिपादन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले. रावसाहेब थोरात सभागृहात केटीएचएम महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक नाना महाले, सचिन पिंगळे, प्रल्हाद गडाख, नानासाहेब दाते, सुमन बागले, अलका गुंजाळ, शिक्षणाधिकारी डॉ. आर. डी. दरेकर, प्रा. एस. के. शिंदे आदी उपस्थित होते. संजय दराडे म्हणाले, महाराष्ट्रामधून दरवर्षी जवळपास १०० विद्यार्थी यूपीएससीत यशस्वी होत असून, त्यांना चांगले मार्गदर्शनही मिळत असल्याने त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत असल्याचे सांगितले. यावेळी महाविद्यालयातील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाºया विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी प्रास्ताविक, तर डॉ. डी. पी. पवार व प्रा. तुषार पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. एम. बी. मत्सागर यांनी आभार मानले.
परिश्रमांसोबतच नियोजनातून यशप्राप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 1:05 AM