नाशिक : सुरगाणा तालुक्यातील अवळपाडा येथील एका नऊ वर्षांच्या मुलीने गिळलेले एक रुपयाचे नाणे श्वासनलिकेत अडकल्याने जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी झटपट शस्त्रक्रिया करीत तिला जीवदान दिले. डॉक्टरांनी तातडीने केलेल्या शस्त्रक्रियेमुळेच तिचे प्राण वाचल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले. अवळपाडा येथील राहत्या घरी संध्याकाळी खेळताना हातातील एक रुपयाचे नाणे पायल वरडे या मुलीने तोंडात टाकले. त्याच्याशी खेळताना अचानकपणे नाणे घशातून श्वासनलिकेत जाऊन अडकले. त्यामुळे तिला खूप त्रास होऊ लागल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. अखेरीस श्वास घेणेदेखील अशक्य होऊ लागल्याने पालकांनी तिला सुरगाणा रुग्णालयात दाखवले. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात कर्तव्यावर असलेले कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. संजय गांगुर्डे व डॉ. शेळके यांनी एक्स-रे तपासणी केली. तत्काळ भूलतज्ज्ञ डॉ. वलवे आणि डॉ. गाडेकर यांनी पालकांच्या संमतीने भूल देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मध्य रात्रीच्या सुमारास डॉ. संजय गांगुर्डे व डॉ. शेळके यांनी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून नाणे काढून पायलला जीवदान दिले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी डॉ. गांगुर्डे, डॉ. शेळके, डॉ. वलवे, डॉ. गाडेकर, तेजस कुलकर्णी व अतुल पवार यांचे कौतुक केले.
मुलीच्या गळ्यात अडकलेले नाणे काढण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 11:27 PM