त्र्यंबकेश्वर : गावाची स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आदी दैनंदिन कामे गावाने पर्यायाने ग्रामपंचायतीने करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना उपसभापती रवींद्र भोये यांनी केले. ग्रामपंचायतींचा सर्वंकष विकास व्हावा, संपूर्ण वसुली करून ग्रामपंचायत हद्दीतील हवी ती विकासकामे करण्यासाठी तालुक्यात सरपंच परिषदेची स्थापना करण्यात आली. सरपंच परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून विद्यमान भोये यांची एकमताने निवड झाली, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पं. स. अध्यक्ष ज्योती राऊत, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, सहायक गटविकास अधिकारी समीर वाठारकर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी दगडू राठोड, उपअभियंता विजय साळुंखे, समाज कल्याण विस्तार अधिकारी भामरे उपस्थित होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, जलसंधारणाची कामे पर्यावरण, कुपोषण, पीक पद्धती, वनीकरण, वृक्षतोड, साक्षरता, रोजगार, शिक्षण, दारूबंदी, प्रदूषण, अंधश्रद्धा, बालमृत्यू रोखणे आदी कामांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. तालुक्यातील गावांचा विकास साधण्यासाठी पंचायत समिती स्तरावरील प्रशासनाकडून कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींपैकी मोठ्या लोकसंख्येच्या एकूण १८ ग्रामपंचायतींची प्राथमिक स्तरावर निवड करण्यात येऊन एक वर्षासाठी सरपंच परिषदेची स्थापना करण्यात आली. यावेळी सरपंचांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. वरील विकासकामांसह कुपोषण, पीक पद्धती, वृक्षतोड, वनीकरण, साक्षरता, शिक्षण, रोजगार, ग्राम सुरक्षा, दारूबंदी, प्रदूषण, सौरऊर्जा, बाजार व्यवस्था, गटशेती, शेतकरी विकास, अंधश्रद्धा आदी कामांसह गावांचा विकास साधण्यासाठी हिवरे बाजार राळेगणसिद्धी पाटोदा (जि. औरंगाबाद) तसेच बागलाण तालुक्यातील किकवारीच्या आदर्श ग्रामपंचायतीच्या धर्तीवर आपल्या ग्रामपंचायतींचा विकास साधण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घेऊन कार्यरत असावे, असेही आवाहन भोये यांनी केले. वाघेरा येथील सरपंच जयराम मोंढे यांनी सरपंचांना कामे करताना येणाºया समस्या, ग्रामसेवकांचे असहकार्य, दप्तर दिरंगाई वगैरे अडचणी विशद केल्या.
योजना यशस्वीपणे राबवाव्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 1:04 AM