निफाड : सध्याच्या मोबाइल इंटरनेटच्या युगात विद्यार्थी अलगद गुंतत चालला आहे. विद्यार्थ्यांचा टीव्ही, मोबाइल, व्हिडीओ गेम खेळण्याकडे, गाणी ऐकण्यामध्ये त्यांचा कल वाढत चालला असून, त्यामुळे वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करणे हे शाळांचे तसेच पालकांचे कर्तव्य असते. असाच प्रयोग निफाडच्या वैनतेय विद्यालयात घेण्यात आला आणि वाचन प्रकल्प यशस्वी करण्यात आला. इयता आठवी तुकडी अच्या सर्व विद्यार्थ्यांनी वर्षभर विविध पुस्तके वाचून हा प्रकल्प यशस्वी केला आहे. वैनतेय विद्यालयाच्या प्राचार्य मालती वाघावकर, उपप्राचार्य रेखा चौधरी, पर्यवेक्षक पर्यवेक्षक डी. बी. वाघ, पर्यवेक्षक टी. के दराडे, मराठी विभागप्रमुख एस. एम. सोनवणे, वाचन वर्गाचे शिक्षक एस. एस. सूर्यवंशी यांनी या वाचन प्रकल्पाचे नियोजन केले. या उपक्रमात शाळेतील ८३ विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवला. यासाठी शिक्षकांनी गोष्टीची सुमारे शंभर पुस्तके उपलब्ध करून दिली होती. या विद्यार्थ्यांनी आवर्तन पद्धतीने प्रत्येक पुस्तकाचे वाचन केले. शाळेच्या वतीने वर्षभर हा प्रकल्प राबवण्यात आला. वर्षानंतर या वाचन प्रकल्पाची सांगता करण्यात आली. न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक विश्वस्त वि .दा. व्यवहारे यांनी विद्यालयात वाचन प्रकल्प राबवण्यिाचे आवाहन केले होते. प्राचार्य मालती वाघावकर यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांसाठी वाचनालये, पुस्तके, वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यातून होणारा संस्कार अधोरेखित केला. इयत्ता आठवी तुकडी अच्या विद्यार्थ्यांना पुढील काळात वाचन प्रकल्प राबवण्याचे आवाहन त्यांनी केले.
वैनतेय विद्यालयात वाचन प्रकल्प यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:26 AM