नाशिक : नाशिकच्या शहर बससेवेला दुपारी बारा वाजताच अचानक ‘ब्रेक’ लागला. दोन तासांपासून शहर बसची चाके थांबली असून. प्रवाशांचे हाल होत आहे. बसथांब्यांसह स्थानकांमध्ये बसेसच्या प्रतीक्षेत नागरिक उभे असून बसेसचे दर्शन होत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिलांचे सर्वाधिक हाल होत आहे. शहर बसेसमध्ये नादुरूस्त बसेसची संख्या अधिक असून वर्कशॉपमध्ये बसेस वेळेवर दुरूस्त केल्या जात नाही, असा आरोप बस चालक-वाहकांच्या संघटनेने केला आहे. यामुळे बसचालक-वाहकांनी आगारात आंदोलन करत नादुरूस्त बसेस ‘स्टार्ट’ न करण्याची आक्रमक भूमिका घेतली. रजेचे प्रमाण अधिक निघाल्यामुळे वर्कशॉपचे कर्मचारी सुटीवर गेले आणि मनुष्यबळ अपुरे पडल्यामुळे नादुरूस्त बसेस दुरूस्त करण्यास वेळ झाला अशी माहिती महामंडळाच्या प्रशासनाने दिली आहे. दुपारी बारा वाजेपासून शहराच्या सर्वच मार्गावरील बसफेºया बंद पडल्या आहेत. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत बससेवा सुरळीत होऊ शकणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे बसेसची प्रतीक्षा प्रवाशांना सध्यातरी कायम आहे.