नाशिकरोड : भुसावळ-पुणे रेल्वेचा मार्ग अचानक बदलला आणि मनमाडहून ही रेल्वे नगर, दौंडमार्गे पाठविण्यात आल्यानंतर प्रवाशांना त्याची पूर्वकल्पनाही देण्यात आली नाही. त्यामुळे शेकडो प्रवासी ताटकळले. सदरची रेल्वे परस्पर गेल्याचे कळल्यानंतर मात्र तिकिटाच्या परताव्यासाठी गोंधळ उडाला. नियोजनशून्य कारभाराबद्दल प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. भुसावळहून नाशिकरोडमार्गे पुण्याला जाणारी रेल्वे पहाटे पाच वाजेच्या सुमारास येथे येत असते. त्यानुसार प्रवाशांनी तिकिटे काढली होती; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ही रेल्वे परस्पर मनमाडहून नगर, दौंडमार्गे पुण्याला पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात नाशिकरोड स्थानकावर कोणत्याही प्रकारची उदघोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे विलंबाने रेल्वे येईल या अपेक्षेवर असलेल्या रेल्वे प्रवाशांना स्थानकावर कोणतीच माहिती मिळत नव्हती. इतकेच काय सदरची रेल्वे रद्द झाली किंवा कसे याबाबतही माहिती देण्यात आली नाही. तथापि, ही रेल्वे मनमाडमार्गे पुण्याला पाठविण्यात आल्याचे कळताच प्रवाशांनी रेल्वेस्थानकावर गोंधळ घातला. अनेकांनी तिकिटांची रक्कम परत मागितली. परंतु ती न मिळाल्याने गोंधळ उडाला. काहींनी तक्रार वाहिनीवर संपर्क साधून तक्रार केली. त्यावेळी, परतावा मिळत नसेल तर पोलिसांत तक्रार दाखल करा, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्याचे काही प्रवाशांनी सांगितले, तर दुपारी १२ वाजेनंतर येथे आलेल्या प्रवाशांना तुम्ही सकाळी का परतावा मागितला नाही, असा प्रतिप्रश्न केला. दरम्यान, सायंकाळी पुण्याहून निघालेली रेल्वेही त्याच मार्गे भुसावळकडे पाठविण्यात आली. त्यामुळे सायंकाळीही गोंधळाचे वातावरण होते. गुरुवारी (दि. २) भुसावळ-पुणे रेल्वे नाशिकरोडमार्गेच जाणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
पुणे रेल्वेचा मार्ग अचानक बदलल्याने गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:44 AM