नाशिक : अतिवृष्टीमुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीला अचानक पूर आल्याने यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून याबाबतची सूचना मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले आणि अनेकांना सुरक्षितस्थळी हलविले.
जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा असताना अचानक अतिवृष्टीमुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होतो आणि नदीला पूर आल्याने बचाव कार्यासाठी यंत्रणेची धावपळ होते, सायरन वाजवत आलेली अग्निशमन यंत्रणेची वाहने, इतर दिशांनी भरधाव वेगात आलेली पोलीस वाहने, बोटीसह धावून आलेले जीवरक्षक दल हे दृश्य पाहून सारेच थबकतात. नेमके काय झाले म्हणून लोक गोळा होतात तेव्हा पूर परिस्थितीत बचाव कार्य कसे केले जाते याची रंगीत तालीम सुरू असल्याचे नागरिकांच्या लक्षात येते.
जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने नदीच्या पातळीत वाढ झाली तर पुरामुळे काठावरील बचाव कार्य कसे करता येऊ शकेल याबाबत मंगळवारी (दि.१५) आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून रंगीत तालीम करण्यात आली. या तालमीचा भाग म्हणून गंगापूर धरणाच्या क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने धरणातून नदीपात्रात एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीला पूर आल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सर्व यंत्रणांना माहिती दिली. त्यानंतर तत्काळ शोध व बचाव पथके साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल झाली. यावेळी पेालीस,अग्निशमन यंत्रणा, रूग्णवाहिका, शववाहिका यांनी शोध आणि बचाव कार्याची प्रात्यक्षिके दाखविली.
सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वर्षा मीना, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल भगत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी प्रशांत वाघमारे रंगीत तालमीत सहभागी झाले होते.
(छायाचित्रे: ६२ ते ७२ नीलेश तांबे)