देवळाली कॅम्प: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देवळाली छावनी परिषद हद्दीतील मिठाई दुकानांची लष्कराच्या व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली. सहा दुकानांतील मिठाईचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आले, अस्वच्छतेबद्दल तीन दुकानदारांना नोटिसा देण्यात आल्या. मात्र रस्त्यालगत उघड्यावर होणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रीकडे तपासणी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. लष्करी अधिकारी व राज्यशासनाच्या अधिकारी वर्गाने पहिल्यांदाच एकत्रितपणे तपासणी केली आहे. बाजारपेठेत मिठाई विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सहा दुकानांना भेटी देत तेथील मिठाईचे नमुने घेऊन ते मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविले असून तीन दुकानांमध्ये स्वच्छतेबाबत त्रुटी आढळून आल्याने त्यांना छावनी परिषद नोटिसा पाठवणार आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या 'अन्न सुरक्षा व अनुपालन प्रणाली' च्या आधारे मिठाईचे नमुने ताब्यात घेत तपासणीसाठी ते मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. याशिवाय ज्या ३ दुकानदारांनी स्वच्छतेबाबत दुर्लक्ष केले त्यांना तातडीने नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्या सूचनांची पूर्तता करण्याचे आदेश स्टेशन आरोग्य अधीक्षक कर्नल ए. डॅनियल यांनी देवळाली छावनी प्रशासनास दिले आहे. पुढील आठ दिवसांत ही मोहीम पुन्हा राबविली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. यावेळी राज्य शासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी मिठाई दुकानदार सुधीर गुप्ता, उद्धव उभ्रानी, योगेश सावंत, जुबिन शाह, अनिल चावला, दीपक यादव आदींशी संवाद साधत नव्या नियमांविषयी माहिती दिली. देवळालीत पहिल्यांदाच संयुक्त तपासणीमुळे नागरिकांमध्ये चर्चा होत होती. मात्र देवळाली कॅम्प हद्दीत बारा, तेरा दुकाने असताना सहाच दुकानदारांची तपासणी झाली. देवळाली कॅम्प
येथील मिठाईच्या दुकानामध्ये तयार होणाऱ्या मिठाईची संयुक्त तपासणी होणेकामी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राहुल गजभिये यांच्या सूचनेनुसार लष्कराचे आरोग्य अधीक्षक कर्नल ए. डॅनियल, आरोग्य अधिकारी संजय ठुबे, आरोग्य निरीक्षक रवी पोटे, भैरव के. शिवराज चव्हाण, अतुल मुंडे, शाजेब सय्यद, पर्यवेक्षक विनोद खरालीया यांनी सहभाग घेतला.