सटाणा : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची शुक्रवारी सकाळी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी विभाग प्रमुख, आरोग्य सभापती, व नगरसेवक यांच्या समवेत संयुक्त पाहणी केली. शहरातील १८ स्वच्छता गृह आहेत. त्याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन असलेली अस्वच्छता व काय समस्या आहेत त्या नागरिकांकडून जाणून घेतल्या,व त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या संबधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. येत्या काही दिवसात स्वच्छ सटाणा सर्वेक्षण होणार असून त्यादृष्टीने देखील आतापासूनच तयारी करण्यात येत आहे.जुन्या स्वच्छता गृहांचे संरचना अहवाल करून नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. व काही ठिकाणी लवकरच दुरु स्ती करण्यात यावी अशा सूचना बांधकाम विभागास देण्यात आल्या. प्रत्येक ठिकाणी स्वच्छता गृहासाठी पुरेशा पाण्याची व विजेची व्यवस्था तात्काळ करावी. वेळोवेळी सर्वच ठिकाणी साफ सफाई करावी.जेणेकरून स्वच्छता राहील व नागरिकांच्या तक्र ारी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी आशा स्पष्ट सूचना प्रत्येक विभागास देण्यात आल्या.दिलेल्या सूचनांची लवकर अंमलबजावणी करावी व सर्व नागरिकांना नगरपालिकेच्या वतीने मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच पुढे असेल असा विश्वास नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी व्यक्त केला. यावेळी सभापती दिनकर सोनवणे, माजी सभापती दीपक पाकळे, नगरसेविका भारती सूर्यवंशी,सुरेखा बच्छाव, मुन्ना शेख आरोग्य निरीक्षक केतन सोनवणे, बांधकाम अभियंता, चेतन विसपुते,इंगोले, मिसर, यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. नगराध्यक्षानी स्वत: पाहणी केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सटाणा नगराध्यक्षांकडून स्वच्छतागृहांची अचानक पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 3:57 PM