नाशिक : राज्य सरकारने गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी रेशनमधून प्रत्येक शिधापत्रिकेवर एक किलो साखर देण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार नाशिक जिल्ह्यासाठी सुमारे १० हजार क्विंटलहून अधिक साखर उपलब्ध करून दिली असून, त्याच बरोबर रेशनमधून ‘टाटा नमक’ देण्यासही चालू महिन्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी मालेगाव शहरासाठी अडीचशे क्विंटल मीठ पाठविण्यात आले आहे. जिल्ह्याच्या अन्य भागात टप्पाटप्प्याने मीठ उपलब्ध करून देण्यात येईल.खुल्या बाजारात साखरेचे भाव ३५ रुपयांपर्यंत गेल्याने यंदा गोरगरिबांची दिवाळी साखरेविनाच साजरी करण्याची वेळ आलेली असताना राज्य सरकारने यंदा मात्र खुल्या बाजारातून साखर खरेदी करून ती रेशनवर प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला एक किलोप्रमाणे वाटप करण्याचे ठरविले आहे. यापूर्वी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला लेव्हीची साखर उपलब्ध करून दिली जात असे व दसरा-दिवाळी सणाला प्रती मानसी साडेपाचशे ग्रॅम साखर दिली जात होती. गेल्या चार वर्षांपासून सरकारने ही योजनाच बंद केल्यामुळे आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याकारणाने यंदा राज्य सरकारने आपल्या अखत्यारित साखर देण्याचा निर्णय घेतला. प्रति किलो २० रुपये या दराने प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला साखर देण्यासाठी नाशिक जिल्ह्यात प्राधान्य कुटुंबीयांसाठी ५७१० क्विंटल, तर अन्नपूर्णा, अंत्योदय योजनेसाठी ५३२९ क्विंटल नियतन मंजूर केले आहे. नोव्हेंबर महिन्यात या साखरेचे रेशनमधून वितरण करण्यात येणार असल्याचे पुरवठा खात्याने म्हटले आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख शिधापत्रिकाधारक असून, या सर्वांना ही साखर दिली जाणार आहे.साखरेबरोबरच रेशनमधून मीठ देण्याचाही निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. महिला व बालकांच्या रक्तात लोहाचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना अन्नातून आयोडीन व लोहयुक्त मीठ देण्यासाठी राज्य सरकारने ‘टाटा नमक’शी करार केला आहे. सरकार १४ रुपये दराने मीठ खरेदी करणार असून, शिधापत्रिकाधारकांना अकरा रुपये दराने विक्री करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते मीठ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यासाठी एक हजार क्विंटलची मागणी नोंदविण्यात आली असून, त्यापैकी फक्त अडीचशे क्विंटल मीठ उपलब्ध झाले आहे. सदरचे मीठ सध्या मालेगाव शहरासाठी देण्यात आले असून, उर्वरित मीठ उपलब्ध होताच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये ते वितरीत करण्यात येणार आहे.
रेशनवर दिवाळीसाठी साखर, मीठ उपलब्ध
By श्याम बागुल | Published: November 03, 2018 3:20 PM