नाशिक : सणासुदीचे दिवस व तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत राज्य सरकार गरिबांप्रती मेहरबान झाले असून, जुलै महिन्यात रेशनवर उपलब्ध करून दिलेल्या साखरेमुळे तोंड अजूनही गोड असतानाच, आता पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणपतीबाप्पाच्या मोदकासाठी जादा साखर मंजूर करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, अंत्योदय व अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थींसाठी शासनाने १४ हजार १३० क्विंटल साखरेचा कोटा मंजूर केला असून, तो इतर वेळेपेक्षा अधिक आहे. जुलै महिन्यात सरकारने १० हजार ८३१ क्विंटल साखर मंजूर केली होती. आॅगस्ट महिन्यात सण लक्षात घेता प्रत्येक व्यक्तीमागे १६० ग्रॅम अतिरिक्त म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ६६० ग्रॅम साखर रेशनमधून दिली जाणार आहे. त्यासाठी साडेतेरा रुपये किलो याप्रमाणे दराची आकारणी केली जाणार आहे. गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यापासून रेशनमधून साखर देणे बंद करण्यात आले होते. साखर कारखान्यांनी लेव्हीची साखर देणे बंद केल्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अकरा महिने साखरेविना राहावे लागले होते. आता मात्र शासनाने खुल्या बाजारातून साखर खरेदी करून ती रेशनवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यामुळे यापुढे साखर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्यांनी जुलै महिन्यासाठी उपलब्ध करून दिलेली साखर घेतली नसेल, त्यांनी जुलै व आॅगस्ट अशा दोन्ही महिन्यांची साखर रेशन दुकानदारांकडून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी केले आहे. (प्रतिनिधी)