नाशिक : तीन दिवसांपासून महसूल विभागाने बहिष्कार टाकलेल्या पुरवठा विभागाच्या कामकाज बंदीचा फटका साखर व घासलेट वाहतूकदाराला बसला असून, तीन दिवसांपासून तालुक्याच्या ठिकाणी साखरेचा ट्रक व घासलेटचे टॅँकर उभे असल्याने त्यातून आर्थिक नुकसान सोसण्याबरोबरच त्यातील मालाच्या संगोपनाची जोखीमही पत्करावी लागत आहे. दरम्यान, आगामी दोन दिवस सुटी असल्याने वेळेत साखर व घासलेट उचलले नाही, तर पुढच्या महिन्याच्या वितरणावर त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे. सात तहसीलदारांच्या निलंबनानंतर महसूल विभागाने मंगळवारपासून पुरवठा खात्याचे काम न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा सार्वजनिक वितरण प्रणालीवर परिणाम जाणवू लागला असून, कर्मचारी व अधिकारी पुरवठा खात्याचे कामच करीत नसल्याने रेशन दुकानदारही वैतागले आहेत, तर दुसरीकडे साखर व घासलेटचा पुरवठा करणारे वाहतूकदारही महसूल खात्याचा बहिष्कार कधी मागे घेतला जातो याकडे लक्ष ठेवून आहेत. मंगळवारपासून साखरेचे सहा ट्रक व घासलेटचेही टॅँकर तालुक्याच्या मुख्यालयी उभे आहेत. धान्य गुदामात साखर उतरवून घेण्यास गुदामपाल तयार नाहीत, तर परवानाधारकांकडे घासलेट पोहोचते करण्याचा परवाना टॅँकरचालकाकडे नसल्यामुळे गाड्या उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. माल भरून उभ्या असलेल्या वाहनांमुळे ठेकेदारालाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. (प्रतिनिधी)