नाशिक : महापालिकेच्या विशेष अंदाजपत्रकीय सभेत सदस्यांनी उत्पन्नवाढीसाठी विविध सूचनांचा वर्षाव करतानाच प्रभागातील कामांसाठीही आयुक्तांकडे आग्रह धरला. प्रामुख्याने, आयुक्तांनी लागू केलेल्या त्रिसूत्रीतून वगळण्यात आलेल्या कामांचा पुन्हा अंदाजपत्रकात समावेश करण्याची मागणी सदस्यांनी लावून धरली. विशेष अंदाजपत्रकीय सभेत उत्पन्नवाढीसाठी उपाययोजना सुचविताना सदस्यांनी नगरसेवक निधीच्या उपयुक्ततेकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी, डॉ. हेमलता पाटील यांनी नाममात्र देण्यात आलेले जॉगिंग ट्रॅक मनपाच्या ताब्यात घेण्याची सूचना केली. शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनी खेडे विकास निधीची मागणी केली. गुरुमित बग्गा यांनी सिंहस्थातील साधुग्रामसाठी आरक्षित ५४ एकर जागेवर ११ वर्षांसाठी खासगी बसस्थानक उभारण्याची सूचना केली. मनसे गटनेता सलीम शेख यांनी सदर जागेवर मंगल कार्यासाठी लॉन्स विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला. शिवाजी गांगुर्डे यांनी ट्रक टर्मिनसच्या जागेत टेक्सटाइल्स मार्केट उभारण्याची सूचना केली. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी सांगितले, रोड, पाणी आणि गटार या व्यतिरिक्तही शहराच्या काही गरजा आहेत. औरंगाबाद मनपाच्या धर्तीवर नाशिक महापालिकेने पर्यटनवृद्धीसाठी गाइड प्रशिक्षित करावे तसेच शहरातील पर्यटनस्थळांची माहिती देणारे पत्रक उपलब्ध करून द्यावे. महापालिकेने स्वत:चे वैद्यकीय महाविद्यालय उभारावे. साधुग्रामसाठी आरक्षित जागेत ट्रेड फेअर सेंटर विकसित करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. सुषमा पगारे यांनी जेंडर बजेटची संकल्पना राबविण्याची मागणी केली.चंद्रकांत खाडे आणि प्रशांत दिवे यांनी मागासवर्गीयांसाठी राखीव निधी फक्त मागासवर्गीय वस्त्यांसाठीच वापरण्याची मागणी केली. भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी प्रभागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची सूचना करतानाच गाळे भाड्यात समतोल असण्याची गरज असल्याचे उदाहरणांसह स्पष्ट केले.नव्या मिळकतींसाठी आजपासून दरवाढमहापालिकेने मिळकतींचे सर्वेक्षण केले असून, त्यात सुमारे ५७ हजार नवीन मिळकती आढळून आल्या आहेत. या नव्या मिळकतींना दि. १ एप्रिल २०१८ पासून भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारली जाणार असून, तसे परिपत्रकही जारी केल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. या आकारणीतून महापालिकेला सुमारे ६० कोटी रुपये प्राप्त होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला.लोकसभा निवडणुकीपूर्वी २४ तास पाणीआयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहर बससेवा ताब्यात घेण्याबरोबरच शहरात लोकसभा निवडणुकीपूर्वी आपण २४ तास पाणीपुरवठा करून दाखवू, अशी घोषणा केली. ३१ मे २०१८ पूर्वी विकासकांनी कंपाउंडिंग चार्जेस भरून अनधिकृत बांधकामे नियमित करून घ्यावीत, अन्यथा सदर बांधकामे पाडून टाकण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला.
उत्पन्नवाढीसाठी सदस्यांनी सुचविले उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 2:02 AM