- संजय दुनबळेनाशिक : जिल्हा परिषदेकडून नियतव्ययाचे असमान वाटप करण्यात आल्याने नांदगाव विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेल्या मालेगाव तालुक्यातील ४२ गावांना निधीच मिळत नसून याला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे हेच जबाबदार असल्याचा आरोप नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार सुहास कांदे यांनी केल्याने जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीचा नूरच पालटला. या आरोपामुळे अर्जुन गुंडे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने बैठकीत काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले. या गोंधळातच पालकमंत्र्यांनी सभा आटोपती घेतली. जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी (दि.१४) जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत जिल्ह्यातील बहुसंख्य आमदार उपस्थित होते. सुरुवातीपासून शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या बैठकीत वेगवेगळ्या विषयांचा आढावा सुरू असतानाच नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी निधी नियतव्ययाचा प्रश्न उपस्थित केला. मालेगाव तालुक्यातील ४२ गावांना निधी मिळत नसून यासंदर्भात असलेला अध्यादेशच त्यांनी बैठकीत वाचून दाखविला. याला सर्वस्वी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे हेच कारणीभूत असून ते कार्यालयात भेटत नाहीत. त्यांची पूर्णपणे माहिती देत नाहीत, असे वेगवेगळे आरोप त्यांनी केले. याबाबत गुंडे हे उत्तर देण्यास उभे होते. नियमाप्रमाणे निधीचे वाटप करण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात होते. मात्र ते बेालत असताना आमदार कांदे हे खंडन करण्याचा प्रयत्नही दुसऱ्या बाजूने करत होते. कांदेच्या आराेपांची सरबत्ती सुरू असतानाच गुंडे यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते पटकन खुर्चीवर बसले त्यांची तब्बेत बिघडल्याचे आजूबाजूच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांचा त्यांच्याभोवती गराडा पडला. डॉक्टरांची शोधाशोध सुरू झाली. यामुळे बैठकीत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत योग्य ती चौकशी करून निर्णय घेण्याचे जाहीर करत पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक आटोपती घेतली.