चांदवड : तालुक्यातील भरवीर येथील सैन्य दलातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज (२७) यांचे १९ ऑक्टोबर २०१९ रोजी अरुणाचल प्रदेशातील टेंगा व्हॅली येथे लष्करी छावणीमध्ये संशयास्पद स्थितीत निधन झाले होते. दिनांक २२ ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. लष्करी छावणीमध्ये त्यांनी संशयास्पद स्थितीत आत्महत्या केल्याची बाब वाळुंज यांच्या कुटुंबाच्या लक्षात येताच तेव्हापासून या दिशेने त्यांनी चौकशी केली. याप्रकरणी तब्बल दोन वर्षांनंतर चौघांवर आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जुन हा त्याच्या पत्नीच्या वैवाहिक वादामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली होता आणि त्यातूनच त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे लष्कराच्या अंतर्गत चौकशी अहवालात (कोर्ट ऑफ इन्क्वायरी) स्पष्ट झाले आहे. अर्जुनचा दिनांक १७ एप्रिल २०१९ रोजी पुनम उत्तम पाटील (रा. आसरखेडे, ता. चांदवड) हिच्याशी विवाह झाला होता.
याप्रकरणी मृत अर्जुनचा भाऊ सागर वाळुंज याने अरूणाचल प्रदेशमधील रूपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी अर्ज दिला होता. लष्कराचा चौकशी अहवाल, अर्जुनचे शेवटचे कॉल संभाषण आणि इतर काही सर्व पुरावे बघता पोलिसांनी तब्बल दोन वर्षांनंतर दिनांक २२ जून २०२१ रोजी उत्तम पाटील / गांडुळे (सासरा), पुनम पाटील (पत्नी), अमोल पाटील (मेहुणा) व जालिंदर वाघचौरे (साडू) यांच्या विरूद्ध अर्जुनला मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०६प्रमाणे गुन्हा नोंदवून या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
(13 एम.एम.जी.2)