नाशिक : यंदा समाधानकारक पाऊस होऊनही शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येच्या घटना थांबल्या नसून, निफाड तालुक्यातील दोघा तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याने जिल्ह्यात आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ७४ झाली आहे. त्यात एकट्या निफाड तालुक्याची संख्या २४ इतकी आहे. परशराम भिला सिरसाठ (३२) रा. खेड व चांगदेव अशोक खालकर (३५) रा. औरंगपूर अशी या दोघा शेतकऱ्यांची नावे आहेत. सिरसाठ याने विष प्राशन करून तर खालकर याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. या दोघांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्त्या केली किंवा नाही याची चौकशी पोलीस करीत असले तरी, चालू वर्षात आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ७४वर पोहोचली आहे. आर्थिकदृष्ट्या सधन व संपन्न असलेल्या निफाड तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. चालू वर्षात २४ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या असून, त्याखालोखाल मालेगाव- ९, बागलाण- ८, सिन्नर, नांदगाव प्रत्येकी ७, चांदवड- ५, दिंडोरी- ४, येवला, कळवण- ३, देवळा- २ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत.
निफाड तालुक्यात दोघांची आत्महत्त्या
By admin | Published: October 16, 2016 2:53 AM