ओझर (नाशिक)- एचएएलचे सुखोई विमान निफाड तालुक्यातील गोरठाण-वावी शिवारात सराव करत असताना अचानक तांत्रिक बिघाड होऊन कोसळले. त्यातील दोन वैमानिक पॅराशूटच्या सहाय्याने सुखरूप खाली उतरले. सदर घटना बुधवारी सकाळी १०.३० वाजता घडली. ओझर येथील धावपट्टीवरून उड्डाण केलेले एचएएलचे सुखोई विमान काही तांत्रिक बाबीमुळे कोसळल्यामुळे परिसरात जोरदार आवाज झाला.जमिनीवर आपटताच आगीचे लोळ पसरले होते. आवाजामुळे परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले. मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे वणीच्या पाच किलोमीटर अंतरावर वावी ठुशी भागात सदर विमान कोसळले असले तरी यातील वैमानिकांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने ते सुखरूप आहेत. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती तर एचएएलच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. सदर घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली असून विमान कोसळतात मोठा आवाज झाला. त्यात विमान पूर्णपणे जळून खाक झाले आहे. सदर लढाऊ विमान संदीप ढोमसे यांच्या द्राक्ष बागेवर कोसळले आहे.
नाशकात सुखोई Su-30MKI विमान कोसळले, प्रसंगावधान दाखवल्यानं दोन वैमानिक बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:19 PM