नाशिक : मार्चअखेर शहरासह जिल्ह्यात ऊन्हाच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवत असल्याने नाशिककर उन्हाच्या चटक्याने कमालीचे त्रस्त झाले आहे. कमाल तपमानाचा पारा पस्तीशीच्या पुढे सरकल्याने वातावरणात उष्मा प्रचंड प्रमाणात जाणवू लागला आहे. बुधवारी (दि.२८) उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागल्याने रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.चालू महिन्याचा पंधरवडा उलटत नाही तोच उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्यास सुरूवात झाली. नाशिक शहराचे तपमान तीस अंशापुढे सरकले. कमाल तपमानात सातत्याने वाढ होऊ लागल्याने नाशिककरांना उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. मार्चअखेर तपमान जिल्ह्यात चाळीशीपर्यंत पोहचले आहे तर शहरात चाळीशीच्या जवळपास आले आहे. मंळवारी कमाल तपमान ३८.५ अंश इतके नोंदविले गेले होते. आज संध्याकाळी पारा अधिक वाढण्याची दाट शक्यता आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता नाशिकच्या हवामान निरिक्षण केंद्राकडून कमाल-किमान तपमान जाहीर केले जाणार आहे; मात्र मंगळवारच्या तुलनेत आज प्रखर ऊन जाणवत असल्याने पारा ३९ अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.