रविवारपर्यंत पस्तीशीजवळ स्थिरावणाऱ्या कमाल तापमानाने मंगळवारी थेट ३७अंशाच्या जवळपास झेप घेतली. यामुळे मार्च महिन्याचा पहिला आठवडा नाशिककरांसाठी चांगलाच ‘ताप’दायक ठरणार असल्याचे दिसत आहे. उन्हाच्या झळा अधिकाधिक तीव्र होऊ लागल्याने तापमानाचा पाराही वेगाने वर सरकत आहे.
परिणामी उन्हापासून बचाव करण्यासाठी नाशिककर दुपारी १२वाजेनंतर फारसे घराबाहेर पडल्याचे दिसून आले नाहीत. दुपारी १ वाजेपासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत शहरातील बहुतांश रस्ते ओस पडले होते. नाशिककरांना आठवडाभरापासून कडक उन्हाळा जाणवत आहे. शहराचे वातावरण कमालीचे ‘हॉट’ होत असून कमाल तापमानात वाढ होत आहे. मागील आठवड्यात तिशीचा टप्पा गाठलेल्या तापमानाने आता पस्तीशीही ओलांडली आहे.
गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत मंगळवारी नागरिकांना दिवसभर अधिकच उकाडा सहन करावा लागला. रात्रीदेखील थंड वाऱ्याचा वेग कमीच राहिल्याने वातावरणात फारसा गारवा नव्हता. रात्रीही उष्म्याचा त्रास जाणवू लागल्याने नागरिकांनी पंखे, वातानुकूलित यंत्रांचा आधार घेत दिलासा मिळविण्याचा प्रयत्न केला.
---इन्फो---
यावर्षी प्रखर ऊन; पारा अधिक वाढण्याची शक्यता
मार्च महिन्याला सोमवारपासून सुरुवात झाली असून कमाल तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. यावर्षीही उन्हाच्या झळा अधिक तीव्र राहणार असल्याचे संकेत निसर्गाने दिले आहेत. यामुळे नागरिकांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. प्रखर उन्हामुळे शरीरातील पाण्याची मात्रा कमी हाेऊन अशक्तपणा आणि निरुत्साह जाणवण्याच्या तक्रारीही वाढू शकतात, त्यामुळे दिवसभर वेळोवेळी पाणी पिण्यावर भर द्यावा, असे डॉक्टरांनी सांगितले.