मालेगाव : उन्हाळी सुट्टीतील पोषण आहार अनुदान ज्या मुलांची आधार नोंद आहे, पण बँक खाते नाही, अशा १० वर्षांखालील विद्यार्थ्यांचा लाभ त्यांच्या पालकांच्या किंवा संयुक्त नावाने असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघाचे संस्थापक साजिद निसार अहमद यांनी दिली. याबाबतीत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उपसचिव राजेंद्र पवार यांनी ९ जुलै रोजी शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या नावाने आदेश काढला आहे. त्यात म्हटले आहे की, ज्या मुलांची आधार नोंद आहे पण बँक खाते नाही (उदा. १० वर्षांखालील मुले इ.) अशा विद्यार्थ्यांचा लाभ त्यांच्या पालकांच्या किंवा संयुक्त नावाने असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात यावे तसेच मुलांची आधार नोंदणी नाही, त्यांची आधार नोंद झाल्यानंतरच वरीलप्रमाणे त्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या किंवा संयुक्त बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येऊ शकेल.
---------------
तांदूळ, खाद्यपदार्थांचे वाटप
ज्या ठिकाणी बँक उपलब्ध नाही, त्या ठिकाणी आधार नोंदणी असलेल्या मुलांच्या त्यांच्या पालकांच्या संयुक्त पोस्ट खात्यात रक्कम जमा करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. उर्दु शिक्षक संघाचे साजिद निसार अहमद यांनी सांगितले की, यावर्षी पोषण आहाराचे अनुदान बँक खात्यात जमा न करता मागील वर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांना तांदूळ व खाद्यपदार्थ वाटप करण्यात यावे, यासाठी अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघाचा पाठपुरावा सुरू राहील.