कसबे सुकेणे : शेतकरी संघटनेची शिखर परिषद नुकतीच आडगाव येथे राज्यभरातून आलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या परिषदेत समन्वयक समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ प्रवक्ते भगवान बोराडे यांनी दिली.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देऊन नवीन कर्ज उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांचे वीजबिल मुक्ती करून शेतीला पूर्ण दाबाची वीज उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करणे, तात्कालिक व महत्त्वाची शेती प्रश्नावर एकसमान भूमिका घेणे आदी विषयावर परिषदेत चर्चा झाली. १० नोव्हेंबर १९८० सालातील शेतकरी संघटनेच्या आंदोलनामध्ये अटक झालेले प्रथम सत्याग्रही कसबे सुकेणेचे अशोक जाधव, आण्णा भाऊ गोसावी, बाजीराव भंडारे, ॲड. उत्तम चिखले या प्रथम सत्याग्रहींचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. शिखर परिषदेला १९८० सालापासून कार्यरत असलेले लक्ष्मीकांत देशमुख, शिवाजी नांदखिले, विदर्भ समिती प्रमुख धनंजय काकडे, शेतकरी संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग रायते, अशोकराव हेमके (जालना), डॉ. पृथ्वीराज पाटील (जळगाव), अनंत सादडे पाटील, गोकुळ पाटील , कैलास पाटील, संजय पाटील (वाडा), वाल्मीक सांगळे , सुनील पवार, नारायण गुरगुडे, एकनाथ धनवटे, प्रदीप पवार, दत्तू पाटील साडदे, आदींसह महाराष्ट्रातील विविध संघटनांचे प्रतिनिधी हजर होते
इन्फो
समिती प्रमुखपदी भगवान बोराडे
शिखर परिषदेत शेतकरी संघटनांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली. समितीमध्ये लक्ष्मीकांत देशमुख (यवतमाळ), शिवाजीराव नांदखिले (पुणे), डॉ.पृथ्वीराज पाटील (जळगाव), धनंजय पाटील काकडे (अमरावती), गोकुळ पाटील (नाशिक), अशोकराव हेमके (जालना), सुनील पवार (नाशिक), पांडुरंग रायते (पुणे), वाल्मीकराव सांगळे (नाशिक), कैलास पाटील (वाडा, जिल्हा ठाणे) यांचा समावेश करण्यात आला तर भगवान बोराडे यांची महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने समन्वय समिती प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.