नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आणि त्यानंतर अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा घेण्यात आल्यानंतर आता येत्या रविवारी (दि. ११) महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. काेराेनामुळे रविवारी ही परीक्षा होणार का? याबाबत परीक्षार्थ्यांमध्येही संभ्रमावस्था असली तरी आयोगातर्फे ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने सप्ताहाअखेरीस संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय घेतला असल्याने एमपीएससीच्या दुय्यम सेवा परीक्षेला कसे जायचे, असा प्रश्न परीक्षार्थ्यांसमोर उपस्थित झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा होणार असल्याने आयोगातर्फे परीक्षार्थ्यांसाठी यापूर्वीच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांसदर्भात मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या असून, यापूर्वी घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा व अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेप्रमाणेच ही परीक्षा होणार आहे. कोरोनामुळे राज्यसेवेची पूर्वपरीक्षा स्थगित करण्याचा निर्णय राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आला होता. त्याविराेधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर अखेर ही परीक्षा २१ मार्च रोजी घेण्यात आली. त्यानंतर आयोगातर्फे २७ मार्चला अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा घेण्यात आली. या दोन्ही परीक्षांनंतर आता ११ एप्रिल रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. दरम्यान,या परीक्षा ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२० मध्ये घेतल्या जाणार होत्या. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अखेर कोरोनाच्या संकटातच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून या परीक्षा घेेेेेतल्या जात आहेत.