नाशिक : मुस्लीम धर्मातील सुन्नी समाजातील धर्मगुरुंच्या कार्यक्रमाची भित्तिपत्रके लावण्यावरून जुन्या नाशिकमधील दूधबाजार परिसरात दोन पंथांच्या वादातून झालेला गोळीबार व दंगल प्रकरणातील सर्व संशयितांची जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩजी़ गिमेकर यांनी बुधवारी (दि़ ३१) निर्दोष मुक्तता केली़ या खटल्यात न्यायालयाने फिर्यादीसह अकरा साक्षीदारांची साक्ष ग्राह्य न धरता संशयाचा फायदा देत संशयितांची निर्दोष मुक्तता केली आहे़जुन्या नाशिकमधील दूधबाजार परिसरात २२ जानेवारी २००० साली मुस्लीम धर्मातील सुन्नी समाजातील धर्मगुरुंच्या कार्यक्रमाची भित्तिपत्रके काही तरुण लावीत होते़ यावेळी प्रतिवादी अल्लाउद्दिन कोकणी, गुलाम ख्वाजा गुलाम अहमद कोकणी व भित्तिपत्रके लावणाऱ्या तरुणांमध्ये वाद होऊन मोठी दंगल उसळली होती़ यावेळी कोकणी यांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती़ या गोळीबारात ७० हून अधिक नागरिक जखमी झाले होते़ दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनाही गोळीबार करावा लागला होता़ न्यायालयाच्या आदेशान्वये भद्रकाली पोलीस ठाण्यात अल्लाउद्दिन कोकणी, गुलाम कोकणी यांच्यासह जमावातील मीर मुख्तार अशरफी, वसीम पिरजादा, एजाज मकराणी, अंजुम मकराणी, गुलामगौस कोकणी, युनूस रझवी, शाहनवाझ कोकणी, इब्राहिम कोकणी, सलीम कोकणी, गुलाम कोकणी, मोईनुद्दीन कोकणी, फैज गुलाब खान, मोहम्मद रफिक कोकणी यांच्यासह ४४ संशयितांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या खटल्यातील प्रतिवादी अल्लाउद्दिन कोकणी यांचा २०१० मध्ये मृत्यू झाला आहे़ संशयाचा फायदान्यायालयात गुलाम ख्वाजा गुलाम अहमद कोकणी यांनी घरावर जमाव चालून आल्याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचे सांगून काही संशयितांची नावे सांगितली़ यावर न्यायालयाने दोन हजारांच्या जमावामध्ये केवळ पाच लोकांना कसे ओळखले असा प्रश्न उपस्थित करून संशयाचा फायदा देत सर्वांची निर्दोष मुक्तता केली़ सरकार पक्षातर्फे अॅड़ व्ही़व्ही़ पारख व अॅड़ एम़वाय. काळे यांनी तर संशयितांच्या वतीने अॅड़ राहुल कासलीवाल यांनी काम पाहिले़
सुन्नी-तबलीग दंगलीतील संशयित निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 1:58 AM