जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी शाळा भर दुपारी दीड वाजता सुटत असल्याने चिमुकल्यांना कडक उन्हामध्ये पायी चालत दोन ते तीन किलोमीटर घरी यावे लागते. दुपारच्या कडक उन्हात शाळेची सुट्टी होत असल्याने लहानग्यांना उन्हाच्या तीव्र झळा सोसणे भाग पडत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच पाल्यांना उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होवू लागल्याचे पालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सकाळी ७.५० मिनिटांनी शाळा भरल्यानंतर दुपारी सव्वा वाजता शाळेची सुट्टी होत असल्याने लहान मुलांना अनवाणी वस्त्यांवर जावे लागते. बहुतेक मुलांच्या पायात चप्पलच नसल्याने डांबरी रस्त्यावरून जाताना चटके सोसणे भाग पडत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी, शेतमजूर तसेच वीटभट्टीवर कामावर असल्याने पालकांकडून शाळा सकाळी आठ ते साडेआकराच्या सत्रात भरण्यात यावी किंवा १०.४५ ते सायंकाळी ५ वा. करण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे काही विद्यार्थी आजारी पडल्याचे पालकांचे म्हणणे आहे. आठ दिवसात शाळेच्या वेळेत बदल न केल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठवले जाणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सरपंच दत्तोपंत सांगळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयराम सांगळे, सतिष आव्हाड, कचरू मेंगाळ, बस्तीराम सांगळे, मारूती बोडके, सोनू मेंगाळ, मुक्ता आव्हाड, संदीप सांगळे, भोराबाई मेंगाळ, अंबादास आव्हाड आदींच्या स्वाक्षरी आहेत
रणरणत्या उन्हात विद्यार्थ्यांची अनवाणी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 5:48 PM